नवी मुंबई : राज्यात १० टक्के पाणीकपात घोषित झाल्यानंतर नवी मुंबईतही त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. अशातच घणसोलीतील सिम्प्लेक्स वसाहतीतील रहिवाशांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अनेकदा अवघे १५ ते २० मिनिटेच पाणी मिळत असल्याने दैनंदिन गरजाही भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.

घणसोली नोडची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १ लाख ३६ हजारांहून अधिक आहे. त्यातील सिम्प्लेक्स वसाहतीत सात सहकारी संस्थांच्या ३,१६८ सदनिकांमध्ये १६ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. एवढ्या मोठ्या लोकवस्तीला सध्या कमी वेळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

सिम्प्लेक्समधील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, काही वेळा केवळ १५ ते २० मिनिटे पाणी सोडले जाते. त्यात स्वयंपाक, पिण्याचे पाणी, कपडे धुणे, शौचालय, आंघोळ यांसह लहान मुले आणि आजारी व्यक्तींच्या गरजा भागविणे अशक्य होते. कमी दाबामुळे वरच्या मजल्यांवर पाणी पोहोचत नसल्याने पाणी भरण्यासाठी रहिवाशांना खाली यावे लागते. अनेकदा तळमजल्यावर पाणी भरत असतानाच पुरवठा बंद होतो.

‘घरात चार माणसांना राहायलाही जागा कमी, मग दोन-तीन दिवसांनी सोडलेले पाणी साठवायचे कुठे?’ असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी साठविण्यासाठी घरांमध्ये जागा नसल्याने अधूनमधून मुबलक पाणी देण्याऐवजी नियमित आणि ठराविक वेळेत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

सध्या पाणीपुरवठा कमी वेळ होत असल्याच्या तक्रारी असताना राज्यात जाहीर झालेल्या १० टक्के पाणीकपातीनंतर घणसोलीतील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीकपात लागू करण्यापूर्वीच प्रत्येक भागाचा पाणीवापर, लोकसंख्या, इमारतींची रचना आणि पाणी साठविण्याची क्षमता यांचा विचार करून नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

विशेषतः सिम्प्लेक्ससारख्या छोट्या सदनिकांच्या वसाहतीत दोन-तीन दिवसांनी मोठ्या प्रमाणात पाणी देणे शक्य नसल्याने दिवसातून किमान दोन वेळा नियमित पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.

‘दोन वेळा तरी व्यवस्थित पाणी द्या’

दुष्काळसदृश परिस्थिती असल्यास पाणीकपात करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, कपातीचे नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी रहिवाशांची भूमिका आहे. ज्या भागांत सध्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो, तेथेही कपात करून सर्वांना दिवसातून किमान दोन वेळा पुरेसे पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये पाणी उपलब्ध असताना सिडकोच्या वसाहतीतील नागरिकांनाच पाण्यासाठी हंडे घेऊन फिरावे लागणे योग्य नाही. पाणीकपात करायची असेल तर ती सर्व भागांत समान पद्धतीने करावी. कोणत्या भागात किती पाणी दिले जाते, किती कपात केली जाणार, याचे स्पष्ट नियोजन जाहीर करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हंडा मोर्चानंतरही परिस्थिती कायम

पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात रहिवाशांनी यापूर्वी हंडा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला होता. आंदोलनानंतरही पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाणी हा मूलभूत प्रश्न असूनही त्यासाठी वारंवार आंदोलन करण्याची वेळ येत असल्याबद्दल रहिवाशांनी संताप व्यक्त केला. ‘सामान्य माणूस कुठे जाणार? आमच्याकडे आंदोलन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. प्रश्न सुटला नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू,’ असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

बैठकीच्या माध्यमातून तोडगा

शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत प्रशासनाचा अभ्यास सुरू असून, येत्या दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. पाणीपुरवठा समिती सभापती रविकांत पाटील यांनी देखील घणसोली आणि कोपरखैरणे भागातील पाणीसमस्या गंभीर असून येत्या दोन दिवसांत त्यावर बैठकीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पाणीकपात लागू झाल्यानंतर घणसोलीसह शहरातील विविध भागांत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कसे असेल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.