फरारी आरोपींचा पोलिसांकडून शोध

ज्याच्याशी लग्न केले तो दोन मुलांचा बाप निघाला. तरीही तिने प्रेमाखातर पनवेल तालुक्यातील कोलीकोपर गावात त्याच्यासोबत संसार थाटला. घरात नवरा, सासू आणि दोन मुले यांच्यासोबत तिचे दिवस सुखात जात होते; परंतु सोमवारची रात्र तिच्यासाठी वैऱ्याची ठरली. खांदेश्वर येथे राहणाऱ्या तिच्या जन्मदात्या पित्याने मुलगा आणि काही नातेवाईकांना सोबत घेऊन तिच्या घरात प्रवेश केला आणि तिचा पती आणि सासूला दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिचे अपहरण केले. सध्या पोलीस तिच्या शोधात आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, एकनाथ ठोंबरे यांनी मुलगी सुषमा हिचे अपहरण केल्याची तक्रार तिचा पती मिथुन आणि त्याच्या आईने पोलिसांत दिली आहे. एकनाथ ठोंबरे हे सरकारी नोकर आहेत. त्यांनी सुषमाचे अपहरण केले आहे आणि ते नातेवाईकांसह फरार आहेत. सुषमाच्या जिवाला धोका आहे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

याआधी एकनाथ यांनी सुषमाच्या या निर्णयाला विरोध केला होता; परंतु सुषमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्यासमोर मला वडिलांसोबत राहायचे नाही, असे सांगितले. तरीही सुषमाने दबावाखाली येऊन जबानी दिल्याचा समज करून घेत ठोंबरे यांनी मुलांसह नातेवाईकांना घेऊन कोलीकोपर गावात प्रवेश केला. त्यानंतर मिथुनच्या घरात घुसून त्याला व त्याच्या आईला लाकडी दांडय़ाने मारहाण केली आणि ठोंबरे यांनी सुषमाला घेऊन तेथून पलायन केले.

पोलिसांनी शोधकार्य हाती घेतले आहे. ठोंबरे यांच्या नगर जिल्ह्यातील गावापर्यंत पोलीस पथक पोहोचले; मात्र ठोंबरे यांच्या गावातील घराला कुलूप असल्याने तेथून परतले. सध्या पोलीस ठोंबरे यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘सरळमार्गी बाप अपहरण का करेल’

ठोंबरे सरळमार्गी आहेत. त्यामुळे ते पोटच्या मुलीचे अपहरण का करतील, असा सवाल  ठोंबरे यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी केला आहे. उलट ठोंबरे हे मिथुनच्या स्वभावामुळे त्रस्त होते. याविरोधात तक्रार देण्यासाठी ते खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाद मागण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता, अशी माहिती एका सहकाऱ्याने दिली. दरम्यान एकनाथ ठोंबरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सरकारी विभागाला पोलिसांनी कळविली आहे.