करोनायोद्धांना सिडको घरात सवलत द्या!

राज्यातील कोविड योद्धा व गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी सिडकोने विशेष गृहयोजना राबवली असून ४४८८ घरे आरक्षित ठेवली आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ

नवी मुंबई : राज्यातील कोविड योद्धा व गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी सिडकोने विशेष गृहयोजना राबवली असून ४४८८ घरे आरक्षित ठेवली आहेत. मात्र ही घरे सिडको इतर अर्जदारांना विकत असलेल्या दरामध्ये विकत आहे. ती सवलतीच्या दरात देण्यात यावी अशी मागणी होत आहे. सिडकोने यंदा घरांच्या किमतीत न केलेली वाढ आणि प्राधान्यक्रमाने घर मिळण्याची हमी या दोन सवलती महत्त्वाच्या असल्याची भूमिका मांडण्यात येत आहे. या घरांसाठीचे अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.

सिडकोने सर्वासाठी घर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ६५ हजार घरे बांधण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातील २४ हजार घरांचे प्रत्यक्षात काम सुरू आहे. यातील ४४८८ घरे ही गेले दीड वर्ष करोनाकाळात जनतेची आरोग्य सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, पोलीस, साफसफाई कर्मचारी यांनी ही घरे देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी करोना योद्धा आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष गृहयोजना १५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभांरभ केला आहे.

कोविड योद्धा आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांना सिडकोची ही घरे घेण्यात रस आहे पण यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करण्यास आणखी वेळ लागणार असल्याने सिडकोने या योजनेला आणखी मुदतवाढ दिली आहे. कोविड योद्धा प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा दाखला यासारख्या प्रमाणपत्रांना वेळ लागत असल्याच्या तक्रारी सिडको व नगरविकास विभागाकडे आलेल्या आहेत. त्यामुळे ही मुदतवाढ सात ऑक्टोबपर्यंत देण्यात आली आहे. सिडकोची ही घरे विकली जात नसल्याने सिडकोने ही मुदतवाढ दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र सिडको प्रशासनाने याचा इन्कार केला असून यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांची पूर्तता ही एक महिन्यात पूर्ण होत नाही. या अर्जदारांना आपली सेवा सांभाळून ही कागदपत्रे तयार करावी लागत असल्याने त्यांना वेळ देणे आवश्यक होते. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.  राज्यातील कोविड योद्धा आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांना बाजारभावाप्रमाणे घरे विकून सिडको या कर्मचाऱ्यांना काही वेगळी सवलत देत नाही अशी टीका केली जात आहे. कोविड काळात योग्य आरोग्य सेवा करणाऱ्या कोविड योद्धा व गणवेशधारी कर्मचाऱ्यांना हक्काचे घर प्राधान्याने मिळत आहे. एका अर्थाने सिडकोने ही एक महत्त्वाची सवलत दिली असून दरवर्षी वाढविण्यात येणारी दहा टक्के अधिक रक्कम यंदा वाढवलेली नाही. त्यामुळे हे दहा टक्के या अर्जदारांना कमी भरावे लागत आहेत.

पंतप्रधान आवाससाठी तीनशे कोटींचा भरणा

याशिवाय पंतप्रधान आवास योजनेत घर घेणाऱ्या रहिवाशांना दोन लाख ६७ हजारांचे केंद्र व राज्य सरकारचे अनुदान मिळत आहे. महागृहनिर्मितीत सिडकोने केंद्र व राज्य सरकारकडून येणाऱ्या या अनुदानाची वाट न पाहता ती रक्कम भरलेली आहे. ही रक्कम तीनशे कोटींच्या घरात गेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Give concessions coroners cidco house ssh

ताज्या बातम्या