पनवेल ः खारघरमधील सेक्टर १५ मध्ये रविवारी रात्री साडेअकरा वाजता खारघरवासियांना सुवर्णकोल्हा मृतावस्थेत आढळला. यामुळे पुन्हा एकदा वन्यजिवांच्या संरक्षणाचा मुद्यावर पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.  खारघरमध्ये काही महिन्यांपूर्वी सुवर्णकोल्ह्याचे अवशेष आढळले होते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने नेमका त्या कोल्ह्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजू शकले नाही. मात्र रविवारी रात्री सेक्टर १५ शेजारी डी.ए.व्ही शाळेलगत सुवर्णकोल्हा मृतावस्थेत आढळल्याने प्राणीमित्रांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाहनाच्या ठोकरीत हा कोल्हा जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र अजूनही नेमके कारण समजू शकले नाही. मागील वर्षभरापासून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी वाहून खारघर खाडीपात्रात सोडण्यासाठी वाहिनी टाकण्याचे काम खाडीपात्रात सुरु आहे. हे काम करण्यासाठी खाडीपात्र सुकविण्यात आले. त्यानंतर या खाडीपात्रात राडारोड्याचा भराव टाकण्यात आला. वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा भराव काढून टाकण्यात येईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा खाडीपात्रात पाण्याची वाट पहिल्याप्रमाणे खुली केली जाईल असेही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सांगितले गेले. मात्र या सर्व कामादरम्यान सुकलेल्या खाडीपात्रातील जलचर आणि खाडीपात्राशेजारी वावर असणाऱ्या प्राण्यांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. खारघरमध्ये यापूर्वीसुद्धा रहिवाशांना सुवर्ण कोल्ह्याचे दर्शन घडले होते. मात्र नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने वारंवार नागरी वस्तीमध्ये वन्यजिव दिसण्याच्या घटना घडत आहेत. यापूर्वी खारघरमध्ये कोल्ह्याचे अवशेष सापडल्यानंतर पर्यावरण अभ्यासकांनी सतर्कता बाळगत वन्यजिव सुरक्षेसाठी विविध सरकारी यंत्रणांकडे तक्रार केली. मागील अनेक महिन्यांपासून प्राण्यांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या प्राणी कल्याण कायदा संनियत्रण समितीच्या मानद प्राणी कल्याण अधिकारी सिमा टॅंक यांच्या एका सहकाऱ्याने रविवारी खारघरमध्ये रात्री गस्त घालताना त्यांना सेक्टर १५ मधील डी.ए.व्ही. शाळेजवळ रात्री श्वानासारखा दिसणारा प्राणी मृतावस्थेत दिसल्यावर तेथे सिमा टॅंक व त्याचे सहकाऱ्यांनी तो सुवर्णकोल्हा असल्याची खात्री केली. मृतावस्थेत कोल्ह्याची माहिती पनवेलच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचल्यानंतर मृतावस्थेमधील कोल्ह्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी पनवेलच्या पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे हे शव सोपवण्यात येणार आहे. या घटनेनंतर पनवेल, तळोजा ते वाशीपर्यंत पसरलेल्या खाडीपात्रालगतच्या प्राण्यांच्या सुरक्षेबाबत शासन गंभीर नसल्याने प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती प्राणी कल्याण अधिकारी सिमा टॅंक यांनी समाजमाध्यमांवर दिली. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा – एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा

सिडकोकडून खारफुटीवर महागृहनिर्माणाची तक्रारकाही दिवसांपूर्वी खारघर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकांजवळील सिडको महामंडळ बांधत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या महागृहनिर्माण प्रकल्पाचे काम खारफुटीवर केले जात असल्याची तक्रार पर्यावरणवाद्यांनी केल्यावर या तक्रारीची तपासणी करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण विभागाने राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाला दिले आहेत. 

हेही वाचा – हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

ज्या पद्धतीने नागरिकरणासाठी नवे शहर उभारणीचे काम जोरदार सुरु असल्याने पाणथळ आणि कांदळवण क्षेत्रालगत लोकांचा वाढलेल्या अतिक्रमणामुळे प्राणी आणि पशूंचे अधिवासाचे क्षेत्र कमी होऊन ते रस्त्यावर आणि शहरीभागात दिसू लागले आहेत. जेथे प्राण्यांचे घर आहे तेथे मासेमारी करणे, रात्र पार्ट्या केल्या जात आहेत. हे सर्व खारघरमध्ये सुरु आहे. सेक्टर १६ मध्ये आपण आजही हे होत असल्याचे पाहू शकता. प्राण्यांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करु शकत नाही त्यामुळे पनवेल महापालिका आणि वन विभागाला पशूप्राण्यांचे नैसर्गिक वास्तव्यांच्या ठिकाणांना सुरक्षित ठेवण्याची विनंती केली आहे. मागील पाच महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.  सिमा टॅंक, प्राणी कल्याण अधिकारी, प्राणी कल्याण कायदा संनियत्रण समिती

Story img Loader