नवी मुंबई:  हे सरकार सर्वसामान्यांचे असून सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे, लोकांनी शिवसेना-भाजपला बहुमत दिले होते. ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्याबरोबर सत्तेसाठी हातमिळवणी करण्यात आली, मात्र अडीच वर्षांपूर्वी झालेली ही चूक आम्ही दुरुस्त केली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माथाडी कामगारांच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. माथाडी कामगार घरांसाठी १५० कोटी दिले, आणखीन २०० कोटी निधी दिला जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

आता माझ्याबरोबर अनुभवी देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे राज्यात काही कमी पडणार नाही. माथाडी कामगारांच्या घरांना प्रोत्साहन देऊ, सिडको घरांसाठी मदत करू. दीड हजार लोकांच्या सरकारी नोकऱ्यांचा निर्णय घेतला. गेली अडीच वर्षे फाइल हलत नव्हती, मात्र आम्ही अनेक निर्णय घेतले. त्यामुळे आमचे सरकार देणारे आहे घेणारे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपसमिती स्थापन झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अपप्रवृत्तींवर कारवाई – फडणवीस

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडीच्या नावावर वसुली करणाऱ्यांमुळे माथाडी संघटना अडचणीत येत आहे, अशी माहिती दिली यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, माथाडी कामगार संघटनांमध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती, त्याचा गैरफायदा घेणाऱ्या अशा वसुली सम्राटांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यांनी यावेळी सांगितले की २०१४ पासून २०१९ पर्यंत या पाच वर्षांच्या काळात माथाडी कामगारांचे विविध प्रश्न  सोडविल्याची माहिती दिली.

नरेंद्र पाटील यांच्याकडे जबाबदारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद पुन्हा नरेंद्र पाटील यांच्याकडे द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हे नरेंद्र पाटील असतील अशी घोषणा केली. महामंडळाच्या  माध्यमातून आतापर्यंत ५० हजार मराठा उद्योजक निर्माण झाले आहे. हे काम सातत्याने सुरू राहिले असते तर आणखीन अडीच लाख मराठा उद्योजक निर्माण झाले असते. बाळासाहेब ठाकरे यांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा असे सांगितले होते ते आज सत्यात उतरत आहे, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.