नवी मुंबई: खेळाचे मैदान की राडारोडा मैदान? करावे गावाजवळच्या मैदानाकडे पालिकेचे दुर्लक्ष

मैदान दुर्लक्षित असून या पालिकेच्या मैदानावर राडारोडा टाकण्यात आला असून हे खेळाचे मैदान आहे की राडारोडा मैदान आहे असा प्रश्न पडतो.

ground near Karave village
पालिकेची खेळाची मैदाने दुर्लक्षित आहेत त्यामुळे खेळाच्या अनुषंगाने त्यामध्ये विकासात्मक बदल कधी होणार असा प्रश्न आहे. (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी,

नवी मुंबई: नवी मुंबई शहरात सर्वसामान्यांसह तरुणांसाठी आवश्यक असणारी खेळाची मैदाने दुर्लक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे शहरातील सिडकोमार्फत खासगी शाळांना दिलेली मैदाने खासगी शाळांनी आपल्याच ताब्यात घेतली आहेत. पालिकेची खेळाची मैदाने दुर्लक्षित आहेत त्यामुळे खेळाच्या अनुषंगाने त्यामध्ये विकासात्मक बदल कधी होणार असा प्रश्न आहे. शहरातील अनेक मैदाने दुर्लक्षित आहेत.करावे तलावाजवळ सेक्टर ३८ येथे खेळाचे मैदान आहे.परंतु हे मैदान दुर्लक्षित असून या पालिकेच्या मैदानावर राडारोडा टाकण्यात आला असून हे खेळाचे मैदान आहे की राडारोडा मैदान आहे असा प्रश्न पडतो.

नवी मुंबई शहरात बेलापूर ते दिघा या ८ विभाग कार्यालयाअंतर्गत शहरात ७८ खेळाची मैदाने आहेत. पालिकेने शहरात राजीव गांधी स्टेडियम सह यशवंतराव चव्हाण क्रिडांगण अशी अनेक मैदाने खेळासाठी विकसित केली आहेत. तर अनेक मैदानावर वाढलेले गवत, मैदानावर असलेले खाचखळगे पाहायला मिळतात. शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असताना खेळाची मैदाने मात्र पालिकेकडून दुर्लक्षित होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे काही शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत.अनेक मुले ही रस्त्यावर खेळताना पाहायला मिळतात तर अनेक मैदानावर गवत वाढलेले आहेत.त्यामुळे मुलांनी खेळायचे तरी कुठे असा प्रश्न निर्माण होतो खेळाच्या मैदानाबाबत पालिकेने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

आणखी वाचा- अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांवर अखेर पोलिसांनीच केली कारवाई, १० डंपर जप्त 

शहरात सकाळी व संध्याकाळी ठराविक वेळेतच उद्याने खुली केली जात आहेत.तर नवी मुंबईत विविध खेळांना प्राधान्य आहे. स्थानिक पातळीवर विविध खेळाबरोबरच क्रिकेट खेळालाही महत्व आहेत.नवी मुंबईतील फोर्टी प्लसचे सामने शहराबाहेरही खेळवले जातात. स्थानिक गावांमध्ये क्रिकेटला खूप महत्व आहे.त्यामुळे शहरभर विविध सामने भरवले जात असताना इतर खेळांच्यासाठीही सोयीयुविधा निर्माण करण्याच्या अनुषंगाने मैदानाकडे पालिकेने लक्ष दिले पाहिजे. सध्या शहरातील मैदानाकडे अतिशय गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे.एकीकडे मुले मोबाईल व टी व्हीं यांच्याकडे ओढली जात असताना सध्या नवी मुंबई महापालिकेची मैदाने ही मुलांना खेळण्यासाठी,सुस्थितीत आणणे आवश्यक आहेत. मैदाने देखभाल विभाग अधिकारी यांच्याकडे असतात. देखभाल दुरुस्तीची कामे अभियंता विभागाच्या मदतीने केली जातात.

नवी मुंबई शहरात असलेली खेळासाठीची अनेक मैदाने हे खाजगी शाळांच्या ताब्यात आहेत. एकीकडे नियमानुसार व सिडकोच्या करारानुसार ही मैदाने शाळेच्या वेळा व्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी खुली ठेवणे आवश्यक असताना खासगी शाळांनी मनमानीपणे सार्वजनिक मैदाने आपल्याच हक्काची असल्याच्या अविर्भावात मैदानांना कुंपन घालून ती कुलूपबंद केली आहेत.त्यामुळे सर्वसामान्य मुलांना खेळासाठी सार्वजनिक मैदानांचा सर्वसोयीसुविधांनी युक्त बदल करण्याची आवश्यकता आहे.

शहरातील अनेक खेळाच्या मैदानांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले.अनेक खेळाची मैदाने पार्किंगची ठिकाणे तर अनेक मैदानावर वाढलेले गवत पाहायला मिळते. पावसाळ्यानंतर दिघा ते ऐरोलीपर्यंतच्या मैदानामध्ये सोयीसुविधांबाबत बदल पाहायला मिळतात. शहरातील सार्वजनिक खेळाची मैदाने ही सुस्थितीत असणे आवश्यक आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असलेली सार्वजनिक मैदाने ही खेळासाठी सुस्थितीत ठेवण्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. मैदाने विकासात्मक कामासाठी तसेच तेथील खेळांच्याबाबत बदलांसाठी योग्य त्या सुधारणा करण्यात येत आहेत. खेळांच्या मैदानाबाबत चांगल्या सुधारणा करण्यात येतील . मैदानावर टाकण्यात आलेला राडारोडा हटवण्यात येईल. -शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी, बेलापुर विभाग

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 16:36 IST
Next Story
नवी मुंबई: फसवणूक करून लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद
Exit mobile version