मुंबई उच्च न्यायालयाने उत्सवी मंडळांना रस्त्यात उत्सव साजरे करण्यास मज्जाव केल्याने रस्त्यातच दहीहंडीसाठी मंडप टाकून डीजेच्या तालावर दणदणाट करणाऱ्या चमकेश मंडळांना चार पावले मागे जावे लागले आहे. त्यामुळे गतवर्षी असलेल्या दहीहंडी रस्त्यातून जवळच्या मैदानात स्थलांतरित झाल्या असून काही दहीहंडी मंडळांनी राज्यातील दुष्काळाची जाणीव ठेवून सरकारला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई, ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतही आता दहीहंडीचा इव्हेंट साजरा केला जात आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या बक्षिसांची बरसात करीत अनेक मंडळांनी रस्त्यांचा ताबा घेतल्याचे चित्र होते. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या उत्सवी मंडळांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या मंडळांचे चांगलेच कान टोचले आहेत. उत्सवी मंडळांचे मंडप रस्यात राहणार नाही याची काळजी पोलिसांना घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी ओळखल्या जाणाऱ्या ऐरोली येथील सुनील चौगुले स्पोर्टस असोशिएशनची दहीहंडी या वेळी सरस्वती विद्यालयाच्या मैदानात स्थलांतरित करण्यात आली आहे. ही दहीहंडी यापूर्वी इच्छापूर्ती गणपतीच्या चौकात होत होती.  या उत्सवाला गर्दीही मोठय़ा प्रमाणात होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. यावर्षी हा उत्सव जवळच्या मैदानात नेण्यात आला आहे. त्यामुळे आनंदात कोणतीही कमी राहणार नाही असे आयोजक पालिकेचे विरोधी पक्षनेता विजय चौगुले यांनी सांगितले. सुमारे १५ लाखांची बक्षिसे या मंडळाच्या दहीहंडीला हजेरी लावणाऱ्या पथकांना दिली जातात. यानंतर कोपरखैरणे येथील माजी दिवंगत महापौर तुकाराम नाईक यांचे चिरंजीव भाजपचे युवा नेते वैभव नाईक यांच्या मंडळानेही यावर्षी डी मार्टसमोर होणारी दहीहंडी स्थलांतरित करून याच विभागातील सेक्टर सातमधील पालिकेच्या मैदानात हा उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. या ठिकाणी पहिले बक्षीस एक लाख एक हजाराचे राहणार आहे. नेरुळ येथे नगरसेवक रवींद्र इथापे यांच्या जनकल्याण मंडळाच्या वतीने सेक्टर १९ मधील चौकात होणारी दहीहंडी या वेळी इथापे यांच्या कार्यालयामागे असणाऱ्या मैदानात होणार आहे. इथापे यांनी एकूण ११ लाखांची बक्षिसे लावली आहेत. यातील पहिले एक लाख ५१ हजार रुपये दुष्काळग्रस्त भागाला दिले जाणार आहेत. नवी मुंबईत दोनशेपेक्षा जास्त मैदाने असताना इव्हेंट मॅनेजमेंट आणि व्होट बँकेला खेचण्यासाठी ही मंडळे दहीहंडी इतकी वर्षे भर रस्त्यात करीत होते.
मोफत रुग्णवाहिका
दहीहंडी उत्सवात मोठमोठय़ा थरावर जाणारे गोविंदा खाली पडून जखमी होत असतात. यात काही बालगोविंदा मृत्यूदेखील पावले आहेत. या जखमी होणाऱ्या गोविंदांसाठी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी वाशी स्टर्लिग व्होकार्ट या रुग्णालयाच्या वतीने परिचारिका व वैद्यकीय सेवेसह मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या वेळेत ८८८०४२०० या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उधळपट्टी टाळण्याचे आवाहन
राज्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडय़ात तर जनावरेदेखील चारा-पाण्यावाचून मृत्युमुखी पडत आहेत. राज्यातील आपलेच भाऊबंद अशा दारुण स्थितीत जगत असताना आपण धार्मिक व सार्वजनिक उत्सवांवर अनावश्यक उधळपट्टी करणे योग्य नाही. त्यामुळे अशा उत्सवांवर होणारा अवाजवी खर्च टाळून साधेपणाने सण साजरे करण्यात यावेत आणि या उत्सवांवर होणारा खर्च दुष्काळग्रस्त भागांना देण्यात यावा, असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे.