६० हजार पेटय़ा दाखल, २०० ते ६०० रुपये डझन

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फळांचा राजा खवय्यांसाठी गोड बातमी घेऊन आला आहे. सोमवारी वाशी बाजारात आंब्यांच्या ६० हजार पेटय़ांची विक्रमी आवक झाली. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत कोकण आणि कर्नाटकातून मोठय़ा प्रमाणात आवक झाल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. एकदम आवक वाढल्यामुळे आणि नोटाबंदीमुळे म्हणावा तसा उठाव नसल्याने हापूस आंब्यांच्या किमती २०० ते ६०० रुपये डझनापर्यंत खाली आल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी हापूस आंबा मुंबई- पुण्याच्या घाऊक बाजारात पाठविण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला जात होता. बागेतील हापूस आंब्याच्या झाडावरून चार आंबे उतरवून त्यांचा घरातील देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर हापूस आंब्याचे ट्रक भरून मुंबई- पुण्याला पाठविले जात. स्पर्धेच्या या युगात आता हापूस आंबा जानेवारीतच बाजारात पाठविला जातो. तरीही काही आंबा बागायतदारांनी ही परंपरा सांभाळली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आजही हापूस आंबा बाजारात धाडला जातो. मंगळवारी असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी या हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक हापूस आंबा बाजारात आला. त्यामुळे हापूस आंबा घेऊन येणाऱ्या वाहनांची बाजारात गर्दी होती, तर काही वाहने वाहतूक कोंडीमुळे उशिरा पोहोचली.

जेवढय़ा प्रमाणात हापूस आंब्याची आवक वाढली आहे तेवढय़ा प्रमाणात उठाव नसल्याने व्यापाऱ्यांना कमी किमतीत हापूस विकावा लागत आहे. पाच डझनाची एक पेटी त्यातील आंब्यांच्या आकारानुसार एक ते तीन हजारांच्या घरात मिळत आहे. घाऊक बाजारात हा डझनाचा भाव दोनशे ते सातशे रुपये डझन आहे.

कोकणातील हापूस आंब्याबरोबर कर्नाटकमधील हापूस आंबादेखील बाजारात मोठय़ा प्रमाणात येऊ लागला आहे. त्याचा दर कोकणच्या हापूसपेक्षा कमी आहे. मंगळवारी अनेक व्यापारी हापूस आंब्याची विधिवत पूजा करून त्याची विक्री करतात. एकटय़ा हापूस आंब्याचा व्यापार फळ व्यापाऱ्यांना उभारी देणारा ठरत असल्याने या व्यवसायावर व्यापाऱ्यांची बरीच मदार आहे.