नवी मुंबई : आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे विस्कळीत झालेल्या जागतिक व्यापार साखळीचे तीव्र पडसाद नवी मुंबई, पनवेल आणि उरण औद्योगिक पट्ट्यावर उमटू लागले आहेत. गॅस व कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे अनेक उद्योग कोंडीत सापडले आहेत. उत्पादन खर्चात झपाट्याने झालेली वाढ, पुरवठा साखळीतील खंड आणि गॅस टंचाईमुळे अन्नाची वानवा या पार्श्वभूमीवर सुमारे २० ते २५ टक्के स्थलांतरित कामगार परतीच्या वाटेवर असल्याने औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची चिंता अधिक वाढली आहे.
नवी मुंबईतील ठाणे खाडी परिसरातील टीटीसी (ट्रान्स ठाणे क्रीक) औद्योगिक वसाहत म्हणजेच महापे, पावणे, तुर्भे, घणसोली, ऐरोली आदी भागांचा समावेश असलेला औद्योगिक पट्टा हा राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक मानला जातो. या पट्ट्यात सुमारे ४,५०० लहान-मोठे उद्योग कार्यरत आहेत. रसायन, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध क्षेत्रांतील उत्पादन येथे होते. हे उद्योग सध्या संकटात आहेत. आखाती भागातील संघर्षामुळे तेल व वायू पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून, त्याचा परिणाम औद्योगिक गॅस व इंधनाच्या उपलब्धतेवर झाला आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनी मार्गावरील अनिश्चिततेमुळे कच्च्या मालाची आयात उशिरा होत असून अनेक उद्योगांचा साठा संपत आला आहे. परिणामी, काही उद्योगांनी उत्पादन कमी केले असून काही ठिकाणी तात्पुरते कामकाज थांबवण्याची वेळ आली आहे.
समुद्री वाहतुकीतील अडथळ्यांमुळे परदेशात जाणाऱ्या निर्यात मालावर परिणाम झाला आहे. अमेरिका व युरोपकडे जाणाऱ्या ऑर्डर्स थांबल्या असून, मालवाहू कंटेनरची हालचाल मंदावल्याने तयार माल बंदरांवर अडकून पडत आहे. यामुळे उद्योगांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.
या पार्श्वभूमीवर उद्योग संघटनांनी गॅस पुरवठा सुरळीत करणे, आर्थिक सवलती देणे, कर्जावरील व्याजदर कमी करणे आणि निर्यात-आयात प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
दरम्यान, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम घरगुती गॅस पुरवठ्यावर जाणवत असून, पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर वाशीतील गॅस वितरण सेवा बंद झाल्यास नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती उपमहापौर दशरथ भगत यांनी व्यक्त केली आहे.
कच्च्या मालाची दरवाढ
पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. स्टेनलेस स्टीलच्या दरात किलोमागे सुमारे २० रुपयांची वाढ झाली असून, प्लास्टिकसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या दाण्यांचे दर सुमारे ५० टक्क्यांनी वाढले आहेत. रसायने, धातू व इतर औद्योगिक घटक महागल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. लघु व मध्यम उद्योग साधारण ५ टक्के नफ्यावर चालत असल्याने खर्चातील वाढ त्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेक करार तोट्यात गेले असून उत्पादन मर्यादित करावे लागत असल्याचे उद्योजक सांगत आहेत.
कामगारांवर दुहेरी संकट
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यात सुमारे ४ ते ५ लाख कामगार कार्यरत असल्याचा अंदाज असून, त्यापैकी मोठा हिस्सा स्थलांतरितांचा आहे. औद्योगिक गॅस व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे औद्योगिक भागातील सुमारे ८० टक्के कँटीन बंद पडल्या आहेत. कँटीन बंद पडल्याने अन्नाची समस्या आणि वाढती महागाई यामुळे सुमारे २० ते २५ टक्के कामगार गावाकडे परतले आहेत. विशेषतः उत्तर भारतातून आलेले कामगार इथल्या गैरसोयीमुळे गावी परतत असल्याने त्यांना टिकवून ठेवण्याचे आवाहन उद्योजकांपुढे आहे. पेंधर, घोट, वळप यांसारख्या भागांतील कामगार सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
कच्च्या मालाची अनुपलब्धता आणि कामगारांचे घरी परतणे याचा मोठा परिणाम लहान उद्योगांवर झाला आहे. कामगार टिकले नाही तर लहान उद्योग जास्त काळ तग धरू शकणार नाहीत. सरकारने सर्वसामान्यांना घरगुती गॅस उपलब्ध करून दिला मात्र, उद्योग क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची भावना आमच्या मनात आहे.– के. आर. गोपी, अध्यक्ष, टीटीसी-एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन
औद्योगिक क्षेत्रातील समस्यांसंदर्भात आमच्याकडे अधिकृतरीत्या कोणतीही तक्रार आलेली नाही. परंतु, चौकशी करून औद्योगिक क्षेत्राचा आढावा घेतला जाईल.- बाळासाहेब खांडेकर, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
