नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथील ओवे मैदानावर आज ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणाऱ्या गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा पहिला दिवस उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. समागम सोहळ्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली असून गुरुबाणी आणि कीर्तनाच्या सुरावटींनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

इ.स. १६७५ मध्ये दिल्लीतील चांदणी चौक येथे धर्मस्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या गुरु तेग बहादूर यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ हा समागम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतीस्थळ म्हणून उभारलेले गुरुद्वारा शीश गंज साहिब हे शीख समाजाचे प्रमुख तीर्थस्थान मानले जाते. त्या ऐतिहासिक घटनेच्या ३५० व्या वर्षानिमित्त नवी मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा समागम पार पडणार असून या सोहळ्याला २० लाख भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

पहिल्या दिवशी सकाळपासूनच खारघर रेल्वे स्थानकात पंजाबी बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मुंबई, ठाणे, पुणे तसेच इतर शहरांतून आलेले भाविक रेल्वेमार्गे खारघर येथे दाखल होत आहेत. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे खारघर रेल्वे स्थानकापासून ओवे मैदानापर्यंत मोफत बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. समागमासाठी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नवी मुंबई, पनवेल आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. बेस्ट, टीएमटी, केडीएमटी आणि एनएमएमटी या वाहतूक उपक्रमांच्या माध्यमातून एकूण ३१० बस उपलब्ध करून देण्यात आल्या असून या बसेस विविध प्रमुख ठिकाणांहून खारघरकडे धाव घेत आहेत.

खारघर रेल्वे स्थानकापासून कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून रेल्वेमार्गे येणाऱ्या भाविकांना कार्यक्रमस्थळी पोहोचणे सुलभ झाले आहे. प्रशासनाने ही व्यवस्था गर्दीचे नियोजन आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी केली आहे.
स्थानकाबाहेर विशेष मार्गदर्शक फलक लावण्यात आले असून स्वयंसेवक भाविकांना बसस्थानकापर्यंत मार्गदर्शन करत आहेत. नियमित फेऱ्यांमुळे भाविकांची वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे चित्र आहे.

कार्यक्रमस्थळी गुरुग्रंथ साहिबाचे अखंड पठण सुरू असून कीर्तन दरबारात रागी जथ्यांकडून गुरुबाणी सादर केली जात आहे. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या श्रद्धाळूंमुळे परिसर धार्मिक रंगांनी नटलेला दिसत आहे. लंगर व्यवस्थेत शेकडो स्वयंसेवक कार्यरत असून सर्व धर्मीयांसाठी सामूहिक लंगरची सोय करण्यात आली आहे.

सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीनेही विशेष नियोजन करण्यात आले आहे. पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत राहावे यासाठी स्वयंसेवक आणि प्रशासन समन्वयाने कार्यरत आहेत.

३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित या समागमाच्या पहिल्या दिवशीच मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र असून उद्या शेवटच्या दिवशी भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. श्रद्धा, इतिहास आणि सामाजिक ऐक्याचा संगम घडविणारा हा शहीदी समागम नवी मुंबईत उत्साहात सुरू झाला आहे.

हेही वाचा