सीवूड्समध्ये २० लाखांचा गुटखा जप्त
नवी मुंबई : किराणा दुकानाच्या आडून गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दोन ठिकाणी छापे घातले. यात २० लाख ४६ हजारांचा गुटखा आढळून आला. हा गुटखा जप्त करण्यात आला.
राजुराम आसाराम देवासी असे आरोपीचे नाव आहे. एनआरआय पोलीस ठाणे अंतर्गत धनलक्ष्मी अपार्टमेंट सेक्टर ३६ सीवूड्स येथे त्याचे लक्ष्मी किराणा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या अडून येथे गुटखा विक्री केली जाते अशी माहिती पोलीस हवालदार कासम दस्तगीर पिरजादे यांना मिळाली. या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांना माहिती देताच त्वरित साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी कुसुरकर, विजय चव्हाण, पोलीस हवालदार कासम पिरजादे, महेश शेट्टी आदींचे पथक नेमून धाड टाकण्यात आली. तेथे काही प्रमाणात गुटखा मिळाल्यावर आरोपीस पोलिसी हिसका बसताच प्लाझो अपार्टमेंट येथील गाळा क्रमांक १ या ठिकाणीही छापा टाकण्यात आला दोन्हीकडे मिळून तब्बल २० लाख ४६ हजारांचा गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू आढळून आली. हा सर्व माल जप्त करण्यात आला आहे. किराणा दुकानाच्या आडून गुटखा विकणाऱ्यास अटक केली आहे. असून त्याने एवढय़ा मोठय़ा गुटखा कसा आणि कुठून आणला याचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती मालमत्ता व अमली पदार्थविरोधी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांनी दिली.
