नवी मुंबई : करोना साथीचा फायदा घेऊन नैना क्षेत्रात मोठया प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारण्यात आली आहेत. यावर आता सिडकोने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत लहानसहान कारवाई करण्यात येत होत्या. मागील आठवडय़ात सिडकोने उरण तालुक्यातील कंठवली गावाजवळील खाडी किनाऱ्यालगतची सुमारे दोन एकर जमीन हडप करणाऱ्या एका महिलेच्या दोन मजली इमारतीवर कारवाई केली. बेकायेदशीर बांधकामाला अभय मिळविता यावे यासाठी या महिलेने जवळच एका मंदिराची उभारणी देखील केली होती. सिडकोने या मंदिरावर कारवाई मात्र केली नाही.
नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या २७२ गावांचा नियोजनबद्ध विकास (मुंबई विमानतळाच्या परिसराचा अनुभव पाहता) व्हावा यासाठी राज्य शासनाने जानेवारी २०१२ रोजी नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना) जाहीर केले आहे. सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रफळात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना सिडकोची परवानगी घेणे अनिवार्य आहे. सिडकोने या क्षेत्रासाठी ११ नियोजन आराखडे तयार केले असून रस्ते, दिवाबत्ती, गटार, पावसाळी नाले, उद्यान, ग्रोथ सेंटरसाठी काही ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलेले आहे. राज्य शासनाने सिडकोला नियोजन प्राधिकरणाचे अधिकार जाहीर केल्यापासून या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू झाली आहेत. अनेक ग्रामस्थांनी भूमफियांच्या सहकार्याने स्वत:च्या जमिनीवर बेकायदा बांधकामे करुन त्यातील घरे विक्री केली असून काही ठिकाणी भाडय़ाने घरे देण्यात आलेली आहेत.
हे क्षेत्र नैना जाहीर झाल्यापासून अनेक विकासकांनी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी केलेल्या आहेत तर काही विकासकांनी फार वर्षांपूर्वी जमिनींचे व्यवहार पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे अशा जमिनींवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना सिडकोला बांधकाम आराखडा सादर करुन परवानगी घेण्याची आवश्यकता आहे.
उरण तालुक्यातील कंठवली गावाजवळील खाडी किनारी थोडी जमीन खरेदी करुन या जमिनीच्या आसपासच्या खारफुटी जमिनीवर भराव टाकून एक दोन मजली इमारत तयार करण्याचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. स्नेहल किसन राठोड या महिलेच्या नावे हे बांधकाम सुरू होते. सिडकोने हे बेकायदा बांधकाम तोडण्याची एमआरटीपी कायद्यानुसार २०१९ मध्ये नोटीस दिली होती, तरीही हे बांधकाम कायम सुरू ठेवण्यात आले होते. हे बांधकाम करताना केंद्रीय पर्यावरण तसेच सागरी नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायपल्ली करण्यात आल्याचे दिसून येत असून गावामधून येणारा पावसाळी नाला देखील बुजवण्यात आला होता. खारफुटीवर भराव टाकून जमीन तयार करण्यात येत होती. अनधिकृत बांधकामाला भक्त निवास व सभागृह असे जाहीर केले होते.
या बांधकामाबद्दल कंठवली ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी गेले दोन वर्षे होत्या. करोना संकट काळाचा फायदा घेऊन हे बेकायदा बांधकाम उभे करण्यात आले होते.
खारफुटी बुजवून दोन एकर जमीन हडप करण्याच्या या षडयंत्रणाला मुख्य दक्षता अधिकारी डॉ. शशिकांत महावरकर यांनी गुरुवारी सुरुंग लावला. दोन जेसीबी व पोलीस बंदोबस्तात हे बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे.
नैनातील अनधिकृत बांधकामे ही नियोजनाला खीळ घालणारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सिडकोच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. काही बांधकामांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने ती पूर्ण झाल्यावर कारवाई केली जाणार आहे. नैना क्षेत्रातील नागरिकांनी परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करू नये. यानंतर अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. – डॉ. शशिकांत महावरकर, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hammer illegal constructions naina cidco planning major action so far amy
First published on: 17-05-2022 at 00:05 IST