नवी मुंबई : हंगाम सुरू झाल्यापासून एपीएमसीतील फळ बाजारात हापूसची आवक कमी होत असल्याने दर स्थिर होते. मात्र आता हापूसची आवक वाढली असून दर कमी झाले आहेत. दोन ते चार डझनच्या पेटीमागे दर ५०० रुपयांनी कमी झाले आहेत.
वातावरणात उष्मा वाढल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देवगड, रत्नागिरी या भागात हापूसची तोडणी उरकण्यावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामळे हापूसची बाजारातील आवक वाढली आहे. बाजारात हापूसच्या ४४ हजार तर कर्नाटक येथील १६ हजार आशा एकूण ६० हजार पेटय़ा दाखल झाल्या आहेत.
ऐन मोहोर फुटण्याच्या वेळेत अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे हापूसची आवक कमी होत होती. आता हापूसच्या ४४ हजार पेटय़ा आवक होत आहे. त्यामुळे दर ५०० रुपयांनी कमी झाले आहेत.
७०० ते १२०० रुपये डझन
२ ते ४ डझन पेटीला आधी २ ते ५ हजार रुपये दर होते. दर कमी होत आता १५०० ते ४ हजार रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे प्रति डझन ९०० ते १५०० रुपये असलेला हापूस आता ७०० ते १२०० रुपयांपर्यंत आहे.