दुसऱ्या लस मात्रेसाठी नेरुळ, वाशी, घणसोली स्थानकांत सुविधा

नवी मुंबई : दुसरी लस मात्रा घेण्यासाठी नागरिकांचा निरुत्साह पाहता पालिका प्रशासनाने नव्याने काही सुविधा देण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत रेल्वे स्थानकावर लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. वर्दळीच्या नेरुळ व वाशी रेल्वे स्टेशनवर विशेष लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून सकाळी ९ ते ५ या वेळेत सेवा दिली जाणार आहे.

यापूर्वी महापालिका प्रशासनाने सर्व रेल्वे स्थानकावर करोना तपासणी केंद्रे उभारली होती. आता लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.

नवी मुंबई पहिल्या मात्रेचे लसीकरण झाले आहे, मात्र दुसरी लसमात्रा घेण्यासाठी नागरिकांचा निरुत्साह आहे. दिवाळीत ताप नको म्हणून लस घेतली जात नव्हती. मात्र दिवाळीनंतरही या परिस्थितीत फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांना त्यांच्या कामाच्या व घराच्या जवळ लसीकरण देण्याचा प्रयत्न आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानकावर लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपासून वाशी व नेरुळ या स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.  वाशी व नेरुळ स्थानकावर लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आले असून वाशी येथे ११० तर नेरुळ येथे २० लसमात्रा देण्यात आल्या. शुक्रवारी घणसोली स्थानक येथेही लसीकरण सुरू करण्यात येत असल्याचे पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.

घरोघरी जाऊन लस देणार

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने लसीकरणाला गती देण्यासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान  हाती घेतली असून ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी घराजवळ लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही अभियान शहरात प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत घरोघरी भेटी देत लसीकरण न केलेल्या लाभार्थीचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी नागरी आरोग्य केंद्र पातळीवर आशा स्वयंसेविका, एएनएम यांच्यामार्फत गृहभेटी दिल्या जात आहेत. ज्या नागरिकांचा पहिली किंवा दुसरी लसमात्रा शिल्लक आहे त्यांची माहिती संकलित करून त्यांचे त्याच ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे.  महानगरपालिकेची चार रुग्णालये, वाशी ईएसआयएस रुग्णालय येथील जम्बो सेंटर, २३ नागरी आरोग्य केंद्रे, मॉल, एपीएमसी मार्केट  याठिकाणी नियमितपणे लसीकरण सुरू आहे. आता ‘हर घर दस्तक अभियान’ प्रशासनाने हाती घेतले आहे.

शासनाने सूचित केलेल्या ‘हर घर दस्तक’ अभियानामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला अधिक वेग येईल व लवकरात लवकर दोन्ही मात्रा घेऊन नवी मुंबईकर नागरिक संरक्षित होतील.

 – अभिजीत बांगर आयुक्त, महापालिका