नवी मुंबई : हार्बर मार्गावरील नेरूळ आणि जुईनगर स्थानकांदरम्यान रविवारी रात्री ओव्हरहेड वायर (ओएचई) मध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रात्री सुमारे ८.०६ वाजता किमी ३३/२२१ दरम्यान कॅटेनरीची तार तुटल्याची घटना घडली असून, यामुळे अप मार्गावरील सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कॅटेनरी वायर तुटल्याने संबंधित विभागातील वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने पॅन्टोग्राफ खाली घेण्यात आले असून पीएल-१५६ आणि पीएल-१५८ या विभागांमध्ये ओएचई पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
एसडब्ल्यूडी ते जुईनगरदरम्यान अप लाईनवर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गाड्या पुढे जाऊ शकत नसल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली. या बिघाडाचा सर्वाधिक फटका कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना बसला. अनेक गाड्या मधल्या स्थानकांदरम्यान थांबवाव्या लागल्या, तर काही गाड्या उशिराने धावत असल्याने स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. प्रवाशांना उशीर, गोंधळ आणि गैरसोयीला सामोरे जावे लागले.
घटनेची माहिती मिळताच ओएचई विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. शिडीच्या साहाय्याने तुटलेली कॅटेनरी वायर दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, तांत्रिक काम जटिल असल्याने सेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून, शक्य असल्यास पर्यायी प्रवास व्यवस्था वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
