नवी मुंबई : करोनाकाळात सक्षम आरोग्यसेवा पुरवण्यासाठी महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबवून १९११ जणांची तात्पुरती भरती केली होती; परंतु आता यातील आतापर्यंत १४१८ जणांना कार्यमुक्त केले आहे. तर फक्त ४९३ जणांना तात्पुरत्या सेवेत ठेवले असून त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
नवी मुंबई शहरात दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीला पालिकेच्या वाशी रुग्णालयात करोना उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिकेने सिडको प्रदर्शनी केंद्र येथे १२०० खाटांचे जम्बो करोना उपचार केंद्र सुरू केले. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी करोना काळजी केंद्रे उभारली. करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट मोठी होती. त्यामुळे एका दिवसात करोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. तर उपाचाराधीन रुग्णांची संख्याही कित्येक पटीत वाढलेली होती. करोनाच्या या दोन्ही लाटेमध्ये पालिकेने मोठय़ा प्रमाणात तात्पुरती आरोग्यसेवकांची भरती प्रक्रिया राबवली होती. यामध्ये एमडी, एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (आयुष), स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा
तंत्रज्ञ अशा विविध प्रकारांतील १९११ जणांची तात्पुरती भरती केली होती. करोनाबरोबरच शहरभर राबवण्यात येत असलेल्या लसीकरण कामीही या तात्पुरत्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पालिकेला मदत होत आहे. परंतु शहरात करोनाची स्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे. त्याप्रमाणे शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही अत्यल्प आहे. त्यामुळे यातील अनेक जणांना कार्यमुक्त करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. १९११ जणांमधील ४९३ जणांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेने करोनाच्या काळात मोठय़ा प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबवली होती; परंतु सद्य:स्थितीत यातील बहुतांश जणांना कमी करण्यात आले असून १९११ जणांमधून फक्त ४९३ जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पुन्हा आवश्यकता वाटल्यास त्या वेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल. करोनाकाळाव्यतिरिक्त असलेल्या मानधनामध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. – संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त