उरण : जेएनपीए बंदर आणि उरणला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील जड कंटेनर वाहने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन्ही मार्गानी मोकळा श्वास घेतला आहे. परिणामी मार्गावरील दुचाकी व लहान वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. ‘लोकसत्ता’ मध्ये यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत कार्यवाही केली.

या मार्गावर उभी करण्यात येणाऱ्या जड कंटेनर वाहनांमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. या विरोधात उरण मधील सामाजिक संस्थांनी नवी मुंबई वाहतूक विभागाला निवेदन देताच,नवी मुंबई वाहतूक उपायुक्तांनी जेएनपीएमध्ये बैठक घेऊन जड वाहने हटवून मार्ग मोकळे करा अन्यथा कारवाई करू अशी तंबी दिली होती. त्यानंतर उरणच्या वाहतूक विभागाने मुख्य व सेवा मार्गावरील कंटेनर वाहने हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हे मार्ग मोकळे होऊ लागले आहेत.

जेएनपीए बंदरातून दररोज १५ हजारापेक्षा अधिक जड कंटेनर वाहने उरणच्या जेएनपीए बंदर ते पळस्पे व जेएनपीए ते आम्रमार्ग नवी मुंबई या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करीत आहेत. यातील अनेक वाहने बेदरकारपणे वाहतूक करतात. याचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व हलक्या वाहनांना बसतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण मधील जासई, भेंडखळ तसेच द्रोणागिरी परिसरातील मार्गावर उभी करण्यात येणारी कंटेनर वाहने हटविण्यात आली आहेत. त्यासाठी मेगा माईकचा वापर करून सूचना दिल्या जात आहेत. – अतुल दहिफळे, पोलीस निरीक्षक, उरण वाहतूक विभाग