नवी मुंबई : मागील दोन दिवसांपासून नवी मुंबई शहराला पावसाने झोडपून काढले आहे. मात्र मोरबे धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे. नवी मुंबई शहरात गुरुवारी सरासरी ८९.७९मिमी पाऊस पडला आहे.तर मोरबे धरण परिसरात केवळ ८.८मिमी पावसाची नोंद आहे. मोरबे धरणात अशीच पावसाची रिमझिम सुरू राहिली तर यंदा धरण पूर्ण भरेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हेही वाचा : Ganapati Visarjan 2022 Live : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

नवी मुंबई महानगर पालिकेकडून नवी मुंबई शहर आणि सिडकोच्या कळंबोली कामोठे या भागात मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो . दिवसेंदिवस नवी मुंबई शहरात नागरी वस्ती वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. एकीकडे मोरबे धरणात पाणीसाठा वाढत आहे मात्र दुसरीकडे पाण्याचा होणारा पुरवठा देखील वाढत आहे. कालांतराने नवी मुंबई शहराला मोरबे धरण पाणी पुरवठा ही कमी पडण्याची शक्यता असल्याने इतर धरणाचा पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेचे नियोजन सुरू आहे. सन २०१९मध्ये आणि त्याआधी सलग तीन वर्षे ऑगस्टमध्येच धरण ओव्हरफ्लो झाले होते. मागील दोन वर्षांपासून धरण क्षेत्रात कमी पाऊस पडत असल्याने १००% धरण भरण्यास विलंब होत आहे. गुरुवारी नवी मुंबई शहरात पावसाने दमदार हजेरी लावली होती.मात्र धरण परिसरात तुरळक पावसाच्या सरी बरसत होत्या.धरण परिसरात आतापर्यंत २८६५.२मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखीन ३८००मिमी पावसाची आवश्यकता आहे. सध्या धरणात ८५.२४मीटर पाण्याची पातळी असून धरण भरण्यासाठी  ३ मीटर पातळीची गरज आहे. मागील वर्षी सप्टेंबरअखेर धरण पूर्ण भरले होते. यंदा हे धरण पूर्ण भरेल का?