एपीएमसी बाजारात शुकशुकाट

एपीएमसी बाजारातील जवळजवळ ८० टक्के ते ९० टक्के भाजीपाला मुंबई उपनगरात विक्रीसाठी जात असतो.

मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ; फळे, कांदा-बटाटा, भाजीपाला, धान्य बाजारात उठाव कमी
नवी मुंबई : नवी मुंबईसह मुंबई उपनगरात सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा, फळे, भाजीपाला आणि धान्य बाजारांत मुंबईतील ग्राहक फिरकले नसल्याने बाजारात शुकशुकाट होता. भाजीपाला व फळ बाजारात शेतमालाची आवक जास्त आहे. मात्र बाजारात ग्राहक नसल्याने मालाला उठाव नाही.

एपीएमसी बाजारातील जवळजवळ ८० टक्के ते ९० टक्के भाजीपाला मुंबई उपनगरात विक्रीसाठी जात असतो. भाजीपाला बाजारात दररोज ६०० ते ६५० गाड्या दाखल होत असतात. सोमवारी भाजीपाल्याच्या ६३५ गाड्या दाखल झाल्या होत्या. मात्र मालाला उठाव नसल्याने जवळपास ४० टक्के  माल शिल्लक राहिला. त्यामुळे भाज्यांच्या दरांत २० ते ३० टक्के घसरण झाली.

फळबाजारात सीताफळाचे ४-५ टेम्पो, तर डाळिंबाचे १०-१२ टेम्पो आवक झाली. बाजारात मुंबईतील ७० टक्के ग्राहक नव्हते. सध्या बाजारात परदेशातील सफरचंदाचा हंगाम सुरू असून त्याची आवक व पुरवठा मागणीनुसार होत असतो. त्याचबरोबर बाजारात तुरळक प्रमाणात डाळिंब, चेरी, पेर यांचा हंगाम सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात फळबाजारात व्यापार कमी असतो. त्यामुळे फळांच्या बाजारावर परिणाम झालेला नसून बाजारभाव स्थिर आहेत, अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली. धान्य बाजारात १५० गाडी आवक झाली असून बाजारात ग्राहकच फिरकले नाहीत.

भाजीपाला, फळ बाजारात अस्वच्छता

सततच्या पावसामुळे नवी मुंबई शहरासह वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही पाणी साचले होते. बाजार आवारात तसेच मुख्य प्रवेशद्वारावर पाणी तुंबल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. एपीएमसीमधील बाजार समिती ही मुख्य रस्त्यालगत आहे. मुख्य रस्त्यावरील नाले, गटारे उंच भागात आहेत, तर बाजार परिसर सखल भागात आहे. त्यामुळे बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वार व परिसरात पाणी साचले होते. भाजीपाला व फळ बाजारात नाशिवंत माल खाली होत असतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरानिर्मिती होत असते. बाजारात सायंकाळी कचरा उचलला जातो. पावसाचे पाणी साचत असल्याने बाजारात अस्वच्छता पसरली होती.

कांदा-बटाटा बाजारात ६५ गाड्या माल शिल्लक

कांदा-बटाटा बाजार समितीत ९९ गाड्या कांद्याची आणि ५४ गाड्या बटाट्याची आवक झाली. मात्र बाजारात उपनगरातील ४० ते ५० टक्के ग्राहक खरेदीला आलेला नव्हता. त्यामुळे ६५ गाड्या बाजारात शिल्लक राहिल्या आहेत. बाजारभाव मात्र स्थिर असून कांदा प्रतिकिलो १५ ते २० रुपयांवर आहे, तर पावसामुळे बटाटा खराब होत आहे. शेतमालाची आवक कमी झाली नसून मुंबईतील येणारा ग्राहक मात्र पावसामुळे बाजारात फिरकला नाही, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rain fall apmc market customer ssh

ताज्या बातम्या