नवी मुंबईच्या नियोजित विमानतळाचा परिसर पाण्यात

दोन दिवस पडलेल्या संततधार पावसाने विमानतळ परिसर जलमय झाला आहे.

प्रकल्पबाधित डुंगी गाव पुन्हा जलमय
नवी मुंबई : आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाने बोंब असलेल्या सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईत सोमवारी ठिकठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. खारघर, कळंबोली, पनवेल, तळोजा या शहरी नोडबरोबरच विमानतळाच्या शेजारचे गाव असलेल्या डुंगी गाव यंदा पुन्हा पाण्याखाली गेल्याचे दृश्य होते. मुसळधार पावसाने या गावात चार ते पाच फूट पाणी साचल्याने नियोजित विमानतळ पाण्यात असल्याचे दिसून येत होते. विमानतळासाठी सिडकोने एक हजार २६० हेक्टर जमिनीवर भराव टाकला असून उलवा टेकडीची उंची कमी करताना करण्यात आलेल्या उत्खन्नाने हे सपाटीकरण करण्यात आले आहे.

दोन दिवस पडलेल्या संततधार पावसाने विमानतळ परिसर जलमय झाला आहे. पनवेल उरण महामार्गावरील डुंगी गावाची स्थिती तर बिकट झाली आहे. नवी मुंबई विमानतळासाठी दहा गावांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र डुंगी गाव या स्थलांतरातून वगळण्यात आले होते. त्यामुळे २०० हेक्टरवरील या गावाच्या बाजूने भराव करण्यात  आला आहे. विमानतळासाठी ९६ मीटर उंचीची उलवा टेकडीची उंची आठ मीटरपर्यंत कमी करण्यात आली आहे. जवळपास तेवढाच भराव या भागात करण्यात आला असून उलवा नदीचा प्रवाहही बदलण्यात आला आहे. ठाणे खाडीचे भरतीचे येणारे पाणी रोखण्यासाठी एक साडेतीन किलोमीटर लांबीचा कालवाही तयार करण्यात आला आहे. हा नैसर्गिक पातळीच्या खाली असल्याचे आता स्पष्ट होत आहे. विमानतळ करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी गावात पाणी साचत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करीत आहेत. तीन वर्षापूर्वी अशाच प्रकारे गाव जलमय झाल्याने पंप लावून पाणी उपसा करण्यात आला होता तर गणेशोत्सव काळात ग्रामस्थांनी चार ते पाच फूट पाण्यात उभे राहून आरत्या म्हटल्याची दृश्ये समाजमाध्यमावर प्रसिद़ध झाली होती. तीन वर्षानंतरही स्थिती तशीच असून सिडकोने या गावासाठी आपत्ती व्यवस्थापन केलेले नाही, असे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे नियोजित विमानतळ आतापासून पाण्यात जात असल्याचे चित्र सिडकोच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणारे असल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांच्याशी संर्पक साधला असता तो होऊ शकला नाही.

दोन दिवसांच्या संततधार पावसाने गाव जलमय झाले आहे. संध्याकाळी दोन ते तीन फूट पाणी होते. घराघरात पाणी साचले असल्याने लहान मुले व वृद्धांचे हाल झाले आहेत, तरीही सिडकोने योग्य ती उपाययोजना केलेली नाही. विमातनळांच्या बाजूच्या गावांना हेतुपुरस्पर दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत सर्व कुटुंबाचे योग्य ते पुनर्वसन आणि समान मोबदला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गावात राहणार आहोत. -आदेश नाईक, माजी सरपंच, डुंगी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rain fall navi mumbai airport complex water ssh

ताज्या बातम्या