आठवडाभर तालुक्यात असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे. असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पोटरीला आलेल्या भात पिकांसाठी हा पाऊस हानिकारक ठरत असल्याने तो अति पावसामुळे कुजण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यावर्षी उशिरा लागवड झालेली शेती आता कुठे बहरत असताना चिरनेर व परिसरातील शेतातील भात पिके पोटरीला आली असताना भात पिकांना या पावसाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे पोटरीला आलेल्या भात पिकांमध्ये पावसाचे पाणी जाऊन पोटरीला आलेले भात पीक न भरता रिकामे राहण्याची शक्यता असल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

परिणामी तालुक्यातीलसर्व भागात असणारे शेतातील भात पीक असा पाऊस कोसळत राहिला तर आडवे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. जून महिन्यात बरेच दिवस पाऊस गायब झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली तदनंतर येथील शेतकऱ्यांनी भात पिकांच्या लागवडीला सुरुवात केली परंतु काही ठिकाणी भात रोपे ही तयार नसल्यामुळे भाताची लावणी करण्यासाठी आगस्ट महिना उजाडला.

हेही वाचा : नवी मुंबई : भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींची आर्थिक कोंडी

दरम्यान कमी अधिक पडणारा पाऊस गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला पावसाच्या अनियमितपणामुळे यंदा उरण तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु याही स्थितीत भाताचे पीक शेतात बहरू लागल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सरत्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या पिकांना धोका निर्माण केला आहे. जोराच्या पावसाबरोबर वारा देखील असल्याने भाताचे पीक शेतात कोसळून पडेल याची भीती देखील शेतकऱ्यांना वाटत आहे. यंदा भाताचे पीक भरपूर होईल ही येथील छोट्या शेतकऱ्यांची आशा या कोसळणाऱ्या पावसामुळे ती मावळू लागली आहे.