तळोजात अवजड वाहने रस्त्यावरच

तळोजा औद्योगिक वसाहतीत वाहनतळ विकासासाठी उद्योजकांकडून वारंवार मागणी केल्यानंतरही एमआयडीसीकडून निधीची पूर्तता झालेली नाही.

वाहनतळ विकासाकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष; वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीत वाहनतळ विकासासाठी उद्योजकांकडून वारंवार मागणी केल्यानंतरही एमआयडीसीकडून निधीची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे येथील कंपन्यांत येणारी वाहने रस्त्यालगतच उभी केली जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातही होत आहेत. सामेवारी दुचाकीस्वरांचा झालेला अपघातही यामुळेच झाल्याचे समोर आले आहे.

सोमवारी तळोजात झालेल्या अपघातांनंतर येथील वाहनळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील उद्योजकांनी पायाभूत सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार उद्योगस्नेही धोरण असल्याची जाहिरात करीत आहेत, मात्र प्रत्यक्षात उद्योगांना पायाभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याचे मत तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांच्या संघटनेने व्यक्त केले आहे. औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) स्वतंत्र वाहनतळ देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये तोंडरे  गावानजीक  ३०० वाहन उभे करण्याची क्षमता असलेले वाहनतळ आहे. परंतु त्याच्या विकासाचा विषय  सध्या न्यायालयात आहे. येथील खड्डे व चिखलामुळे वाहनचालक येथे वाहने उभी करत नाही. परिणाम म्हणून रस्त्यांलगत ही मालवाहू वाहने उभी असतात. यात घातक रसायने आणि वायूने भरलेल्या वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे मोठय़ा दुर्घटनेची शक्यताही आहे.  वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीही होत आहे. उद्योजकांची संघटना ‘टीएमए’ यांनी वाहनतळाचा मुद्दा न्यायालयात असल्याने पर्याय वाहनतळाची जागेची मागणी केली आहे. मात्र एमआयडीसीने याकडेही दुर्लक्ष केले आहे.

पोलिसांकडून अनेक स्मरणपत्रे

एमआयडीसीला वाहतूक पोलिसांनीही अनेकदा स्मरणपत्रे पाठवून रस्त्यातील खड्डे व गतिरोधक दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र एमआयडीसीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सध्या वाहतूक पोलीसांची चौकीच्या शेजारी एक गतिरोधक दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र गेली अनेक महिने हा गतिरोधक दुरुस्त होऊ शकला नाही. त्याउलट पडघे गावाजवळून रोडपाली उड्डाणपुलाकडे जाणारा मार्गावर गतिरोधक नवीन बांधले आहेत, मात्र तेथे पांढऱ्या रंगाचे पट्टे दर्शविण्यात आले नाही. या ठिकाणी असलेल्या अंधारामुळे येथे अपघात होत आहेत. वारंवार औद्योगिक विकास महामंडळाकडे नवीन वाहनतळ सुरू करावे, असणाऱ्या वाहनतळात सुविधा द्याव्यात आणि रस्त्यांमधील खड्डे व गतिरोधक दुरुस्त करावेत अशा मागण्या लेखी स्वरूपात केल्या आहेत, असे वाहतूक विभागाचे अधिकारी सुनील सावंत यांनी सांगितले.

उद्योजक अनेक वर्षे वाहनतळाची मागणी करीत आहेत. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. सध्या असणारे वाहनतळात न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने तेथे सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे वाहने कुठे उभी करायची हा गंभीर प्रश्न आहे. एमआयडीसीचे आशा कामांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी ‘टीएमए’कडे प्राप्त झाल्या आहेत. याची माहिती आम्ही शासनाच्या वरिष्ठ स्तरावर दिली आहे.

-शेखर शृंगारे, अध्यक्ष, टीएमए

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy vehicles road taloja ysh