नोकरदार व व्यापाऱ्यांकडून संताप; वाहतूक विभागाकडून कारवाईचे संकेत

उरण : तालुक्यातील कंटेनर व अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे दिघोडे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. पूर्व विभागातील चौकात सकाळ, संध्याकाळ कोंडी होत असल्याने नोकरदार व व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात वाहतूक विभागाने कारवाईचे संकेत दिले आहेत.

बंदर आणि त्यावर आधारित उद्योगांमुळे उरणमध्ये मोठय़ा प्रमाणात मालाची साठवणूक करून त्या मालाची ने आण केली जाते. याकरिता उरणच्या पूर्व विभागातही गोदामांची उभारणी झालेली आहे. असे असले तरी या भागात रस्त्यांचे जाळे मात्र अपुरे आहे. उरणच्या पूर्व भागाला गव्हाणवरून चिरनेपर्यंत जाणारा मार्ग आहे. या मार्गावरून पुढे मुंबई-गोवा महामार्गावर जाता येते. त्याचप्रमाणे याच मार्गावरून नवी मुंबई, मुंबई तसेच पनवेल मार्गावर जाता येते. या मार्गाचा वापर उरणमधील नागरिकांसह गोवा, अलिबाग तसेच इतर ठिकाणाहून ये-जा करणारे प्रवासीही प्रवास करीत आहेत. त्यामुळे या मार्गाचा येथील चाकरमानी, विद्यार्थी व व्यवसायिकही वापर करीत आहेत.

या भागातील सार्वजनिक प्रवासी वाहतूकही याच मागार्ने केली जाते. दिघोडे येथे पनवेल, नवी मुंबई तसेच जासई चिरनेर असे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. सध्या या दोन्ही मार्गावरून अवजड कंटेनरची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे या मागार्वरून कामानिमित्त जात असताना दररोज या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे अवजड वाहने असल्याने जरा जरी धक्का लागला तरी अपघात होत असल्याचे चाकरमानी राजेश नागवेकर यांनी सांगितले.

दिघोडे ते दास्तान हा प्रवासी मार्ग असून या मार्गावरूनही मोठय़ा प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने या मार्गाने जासई येथील विद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे दादरपाडा येथील रवींद्र कासुकर यांनी सांगितले.

कोंडी दूर करण्यासाठी चार वार्डन नेमण्यात आलेले आहेत. तसेच, आमचे पोलीस कर्मचारीही कारवाई करीत आहेत. मात्र यापुढे अशा प्रकारच्या कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

अशोक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वाहतूक विभाग