पर्यावरणप्रेमींकडून तीव्र नाराजी; उरण तालुक्यातील सावरखारमधील जमिनीवर मातीचा भराव
उरण : जेएनपीटी परिसरातील सावरखारमधील पाणथळ जमीन बुजवण्यात येत असल्याच्या पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर याची दखल केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असतानाही हे पाणथळ क्षेत्र बुजवण्यात आले आहे. २२.७ हेक्टर म्हणजे सुमारे ५५ एकरपेक्षा जास्त क्षेत्र असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जासई आणि भेंडखळ येथील अंतर्गत प्रवाहाला अटकाव केल्यानंतर सर्वात महत्त्वाची पाणथळ सुकून गेल्याची ही उरणमधील तिसरी घटना आहे, असे नॅट कनेक्ट फाऊंडेशनचे बी.एन.कुमार यांनी सांगितले.
उरण, नवी मुंबईमध्ये पाणजे, बेलपाडा, भेंडकल, टीएस चाणक्य, एनआरआय कॉम्प्लेक्स, भांडुप पंपिंग स्टेशन, भोकडवीरा, सावकार आणि जासई अशा पाणथळ जागा आहेत. यापैकी उरणमधील भेंडखळ, भोकडवीरा, जासई आणि सावरखार पाणथळ जागा गेल्या दोन वर्षांत पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. पाणजे येथील पाणथळ जागा वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित पाणथळ जागाही आता नष्ट होण्याच्या मार्गावर असून याकडे प्रशासन काणाडोळा करीत आहे. वनशक्तीने याविरोधात संबंधित विविध सरकारी विभागाच्या प्रमुखांकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणी लवकरच अवमान याचिकाही दाखल करण्यात येणार आहे.
यातील सावरखार येथे २२.७ हेक्टर क्षेत्र पाणथळ होते. हे पाणथळ बुजवण्यात येत असल्याबाबत फेब्रुवारी २०२२ मध्ये नाट कनेक्ट फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे डॉ. एम. रमेश यांनी ‘प्राधान्याने’ या तक्रारीकडे लक्ष देण्याचे निर्देश राज्य पाणथळ प्राधिकरणाला दिले होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयानेही याची दखल घेत पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांना याबाबत निर्देश देण्यात आले होते. तरीही याबाबत उचित कार्यवाही झाली
नाही. त्यामुळे अखेर सावरखार पाणथळ गायब होण्याचा प्रकार घडला आहे.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांची दखल घेत महसूल अधिकाऱ्यांनी दिवसभरासाठी या भरावाचे काम थांबविले आणि गुन्हाही दाखल केला होता. मात्र माती आणि राडारोडा भरलेले ट्रक आणून काही व्यक्ती पाणथळीवर भराव टाकत आहेत याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा जवाब जेएनपीए बंदर अधिकाऱ्यांनी नोंदवला, असे श्री एकवीरा आई प्रतिष्ठान प्रमुख नंदकुमार पवार यांनी सांगितले. जेएनपीए प्रशासनाशी या बाबत संपर्क होऊ शकला नाही.
जेएनपीएकडून भराव
उरणच्या तहसीलदारांनी तयार केलेल्या तेरा पाणथळ क्षेत्रांच्या यादीत या पणथळचा समावेश होता. सावरखार पाणथळ क्षेत्र हे अडीच आझाद मैदाने मावतील इतक्या आकारमानाचे होते. मागील डिसेंबर महिन्यापासून जेएनपीए (पूर्वीची जेएनपीटी) कडून पाणथळीवर भराव टाकण्याचे काम सुरू होते, असे नॅट कनेक्टचे बी.एन.कुमार आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठाणचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hectare wetlands disappear cm intervention intense resentment environmentalists soil filling land savarkhar uran taluka amy
First published on: 18-05-2022 at 00:03 IST