५.९ मीटपर्यंत गरज; कामाला लवकरच सुरुवात

नवी मुंबई : सिडकोने विमानतळपूर्व कामात उलवा टेकडीची उंची कमी करून साडेपाच मीटपर्यंत सपाटीकरण केले आहे. आता विमानतळ उभारणी करणारी कंपनी उर्वरित चार मीटर अधिक भराव करणार असल्याने विमानतळ धावपट्टीची एकूण उंची ५.९ मीटपर्यंत होणार आहे.

जीव्हीके कंपनीने विमानतळ कंपनीचे हस्तांतरण अदाणी उद्योगसमूहाला केल्याने आता ही अतिरिक्त उंची वाढविण्याचे काम ही नवीन कंपनी करणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून सिडकोने केलेल्या विमानतळपूर्व भरावाच्या कामामुळे पावसाळ्यात आजूबाजूच्या तीन गावांत पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या गावांनीही पुनर्वसनाची मागणी लावून धरली आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यातील ११६० हेक्टर जमिनीवर प्रत्यक्षात विमानतळ उभारले जाणार आहे. सिडकोने या विमानतळ उभारणीची निविदा काढण्यापूर्वी उलवा टेकडीची उंची कमी करणे, उलवा नदीचा मुख्य प्रवाह बदलणे, सपाटीकरण आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर अशी मुख्य कामे गेली तीन वर्षांत पूर्णत्वास आणली आहेत. यात ९८ मीटर उंच असलेली उलवा टेकडीची उंची कमी करून ती साडेपाच मीटर उंचीपर्यंत कमी करण्याचे काम करण्यात आलेले आहे. उलवा टेकडीची उंची कमी करताना निघालेल्या मातीच्या भरावाने विमानतळ परिसराचे सपाटीकरण करण्यात आले असून यासाठी तीन कोटी मेट्रिक टनापेक्षा जास्त मातीचा भराव करण्यात आला आहे.

सिडकोने सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च करून ही विमानतळपूर्व कामे अंतिम टप्प्यात आणली असून आता यावर विमानतळ बांधकाम करणाऱ्या कंपनीने आणखी तीन ते चार मीटर भराव करण्याची आवश्यकता आहे. जीव्हीके कंपनीने अर्धवट सोडलेले काम यापुढे अडाणी एअरपोर्ट कंपनी करणार असून त्याला लवकरच सुरुवात होणार आहे. मातीच्या या अतिरिक्त भरावामुळे या कंपनीला उभारावे लागणारे टर्मिनल्स आणि ग्रीन धाववपट्टीच्या आराखडय़ाप्रमाणे विकास करणे सोपे जाणार आहे.

या अतिरिक्त भरावासाठी लाखो मेट्रिक टन माती लागणार आहे. सिडकोने विमानतळपूर्व कामातील अटीनुसार साडेपाच मीटर उंच सपाटीकरण पूर्ण केले असून आता आवश्यकतेनुसार भराव टाकून सपाटीकरण करणार आहोत.

राजेंद्र धायटकर, मुख्य अभियंता, सिडको