पनवेल : पेण तालुक्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे हेटवणे धरणपात्र ९० टक्के भरण्याच्या वाटेवर असल्याने धरणाचे सहा दरवाजे गुरुवारी सकाळी उघडण्यात आले. त्यामुळे आता तरी खारघर, उलवे आणि द्रोणागिरी वसाहतींमध्ये लागू केलेली २० टक्के पाणी कपात रद्द करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने भोगेश्वरी नदीकाठच्या रहिवाशांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस बरसत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याच्या वाटेवर आहे. पेण येथील हेटवणे धरणाची जलसाठ्याची क्षमता १४४.९८ दश लक्ष घनमीटर एवढी असून सध्याचा उपयुक्त जलसाठा १२७.९८ दश लक्ष घनमीटर आहे. या धरणाची जलाशयाची क्षमता ८६.१० मीटर आहे. ६ दरवाजे गुरुवारी सकाळी उघडल्याने धरणातून वाहणारे पाणी ज्या नदीकाठच्या गावांमधून जाते त्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. गुरुवारी सकाळी धरणातून ३.३५ घन मीटर/से. पाण्याचा विसर्ग झाला. सध्या धरणातील पाण्याची पातळी ८३ टक्क्यांवर पोहचली आहे.

हेही वाचा…नवी मुंबईतील शाळांना सुट्टी… सकाळच्या सत्रातल्या शाळा अर्ध्या दिवसानंतर सोडून देणार

सिडकोच्या उच्चपदस्थांकडून १ ऑगस्टलाच २० टक्के पाणी कपात रद्द

धरणात पाणी साठा कमी असल्याचे कारण सांगून जून अखेरपासून खारघर, उलवे, द्रोणागिरी या वसाहतीमध्ये २० टक्यांची पाणी कपात लागू केली. घराबाहेर पाऊस असला तरी घरातील नळांना पाणी नसल्याने पाण्याचे टँकर खरेदी करुन आणि पिण्यासाठी सिलबंद बाटला खरेदी करुन नागरिकांनी कशीबशी आपली सोय भागवली. गुरुवारी धरण काठोकाठ भरले तरी सिडको महामंडळाचे उच्चपदस्थ अधिकारी १ ऑगस्टपासून पाणी कपात रद्द करण्यावर ठाम असल्याने पावसाचे पाणी हे नवीन कुठल्या धरणात साठवणार का असा प्रश्न संतापलेल्या रहिवाशांकडून विचारला जात आहे. याबाबत सिडको मंडळाने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.