आग्रोली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडको, कोकण भवन, पोलीस आयुक्तालय, फौजदारी न्यायालय, कपास भवन, रिझव्‍‌र्ह बँक, कोकण रेल्वे, पालिकेचे जुने मुख्यालय, बेलापूर रेल्वे स्थानक या सर्व वास्तू या आग्रोली गावातील ग्रामस्थांच्या जमिनीवर उभ्या आहेत. पन्नास वर्षांपूर्वी हे गाव पुरोगामी होतं आणि नवी मुंबईची स्थापना करताना शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयांच्या नजीक असलेल्या या गावाला खऱ्या अर्थाने आधुनिकतेचे वारे लागले. या गावाच्या इतिहासाविषयी..

राज्यात भौगोलिकदृष्टय़ा सर्वात मोठय़ा असलेल्या ठाणे (जुन्या) जिल्ह्य़ातील शेवटचे गाव म्हणजे आग्रोली. बेलापूर रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे गाव पुरोगामी विचारांचे असल्याचा एक भक्कम दाखला आहे. गावातील एक सुज्ञ, सुशिक्षित आणि संस्कारी कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांच्या पुढाकाराने पंचावन्न वर्षांपूर्वी गणेशोत्सव काळात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना अस्तित्वात आणली आणि ती आजतागायत कोणत्याही वादविवादाविना सुरू आहे. नवी मुंबईतील इतर सर्व गावांत सतराशे साठ गणेशोत्सवांची प्राणप्रतिष्ठा केली जात असताना शहरीकरण होण्यापूर्वी केवळ ग्रामस्थांना होणारा अनाठायी खर्च वाचावा म्हणून सुरू करण्यात आलेली ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा आजही नवीन पिढीने कायम ठेवली आहे हे या गावाचे वैशिष्टय़ आहे. याच गावात कॉम्रेड बी.टी. रणदिवे यांचे ग्रंथालय रूपात उत्तम स्मारक आहे. त्यामुळे पुरोगामी विचारांचे हे गाव नवी मुंबईकरांना भूषणावह आहे.

वीस ते बावीस उंबरठय़ांचे हे आग्रोली गाव आता शे-सवाशे कुटुंबांचे झाले आहे. त्यामुळे कधीकाळी शंभर-दीडशे लोकसंख्या असलेल्या या खेडय़ाचे आता संपूर्ण शहरीकरण झाले असून गावाची लोकसंख्या सातशे ते आठशेपर्यंत गेली आहे. सिडको, कोकण भवन, पोलीस आयुक्तालय, फौजदारी न्यायालय, कपास भवन, रिझव्‍‌र्ह बँक, कोकण रेल्वे, पालिकेचे जुने मुख्यालय, बेलापूर रेल्वे स्थानक या सर्व वास्तू या आग्रोली गावातील ग्रामस्थांच्या जमिनीवर उभ्या आहेत. त्यामुळे आग्रोली गाव तसे या परिसराचे वतनदार म्हणावे लागेल. पूर्व बाजूस आर्टिस्ट व्हिलेजपर्यंत घनदाट जंगल, पश्चिम बाजूस पारसिक डोंगराची रांग, दक्षिण बाजूस बेलापूरची विस्र्तीण अशी खाडी आणि उत्तर बाजूस बेलापूर खिंड अशी भौगोलिक रचना असलेले हे आग्रोली गाव म्हणजे एक निसर्गरम्य ठिकाण त्या वेळी मानले जात होते. आज ज्या ठिकाणी बेलापूर रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणी आग्रोलीतील महिला सकाळ-संध्याकाळ पाणी भरण्यास जात होत्या. याच ठिकाणी एक सुंदर तलावदेखील होता. असाच एक तलाव पोलीस आयुक्तालयाला खेटून आहे.

बेलापूर रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या चेरे देवाची आख्यायिका ऐकण्यासारखी आहे. या गावात किंवा बाजूच्या दिवाळे गावातील ग्रामस्थांनी शेतातील धान्य, भाजी किंवा शेतीची अवजारे चोरून नेली तर ती काही तासांत पुन्हा चोरलेल्या ठिकाणी परत ठेवली जात असत, कारण ग्रामस्थ चेरे देवाला नवस लावत होते. त्या देवाच्या भीतीने ही अवजारे किंवा धान्य परत जागेवर येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. हे चेरे देवाचे हे मंदिर मात्र बेलापूर रेल्वे स्थानकाच्या उभारणीत नेस्तनाबूत झाले. याच स्थानकाच्या उत्तर बाजूस सिडकोने केंद्र सरकारकडून अनुदान आणून बांधलेल्या अर्बन हाटची वनराई जपण्याचे काम याच गावातील दत्तात्रेय नामदेव पाटील यांच्या कुटुंबाने गेली अनेक वर्षे केले. तीनही बाजूंनी नैसर्गिक संपदा लाभलेल्या या गावात श्री महादेव, श्री हनुमान आणि श्री गावदेवी अशी तीन मंदिरे आहेत. त्यात गावदेवीच्या मंदिरात ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना १९६२ मध्ये करण्यात आली. त्या वेळी नवी मुंबईत सिडकोचा प्रवेश झालेला नव्हता. गावातील ग्रामस्थ ऋण काढून सण साजरा करीत होते. त्यात ते कर्जबाजारी होत असत.

बेलापूरमधील दुकानदार, सावकार या गरीब भाविक ग्रामस्थांचा फायदा घेऊन धान्याच्या बदल्यात त्यांच्या जमिनी नावावर करून घेत होते. व्यवहारज्ञान आणि लाल बावटय़ाचा प्रभाव असलेले कॉम्रेड भाऊसाहेब पाटील यांनी संपूर्ण गावाची एक बैठक लावून यातून मार्ग काढण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना गावकऱ्यांच्या समोर ठेवली. स्वत: देवदेवस्की न मानणारे कर्मयोगी भाऊसाहेबांच्या शब्दाला गावात एक मान होता. त्यांनी सांगितलेली ही संकल्पना गावाने उचलून धरली आणि गावातील सर्व घरटी गणेशोत्सवांची परंपरा बंद करून एक गाव एक गणपती देवीच्या मंदिरात बसविण्यात आला. त्यासाठी एक वेगळे आसन तयार करण्यात आले. हे मंदिरच मुळात ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधले होते. त्यासाठी लागणारी वीट भाऊसाहेबांनी दिली होती. त्यांची वीटभट्टी होती. याच मंदिरासाठी लागणारे लाकूड भाऊसाहेबांनी जंगलात दोन दोन दिवसरात्र राहून उपलब्ध केलेले आहे. त्यामुळे गावाची ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना संपूर्ण पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरली, मात्र त्याचे अनुकरण कोणी केले नाही.

‘एक गाव.’साठी लागणारी वर्गणी एक मण भाताने दिली जात होती. अतिरिक्त जमा होणारे भात ज्याच्या घरात तांदूळ नाही त्यांना दिले जात होते. बदल्यात त्याच्या शेतात भात झाल्यानंतर त्याने जादा भात जमा करण्याची अट घातली जात होती. गावाचा विकास व्हावा म्हणून नेहमीच झटणाऱ्या भाऊसाहेबांनी ग्रामस्थांना पक्की घरे बांधण्यासाठी विटा देण्यास सुरुवात केली. त्या बदल्यात त्यांच्या शेतात शिल्लक राहणारा पेंढा मात्र भाऊसाहेब हक्काने मागून घेत होते. तो त्यांना वीट भट्टी पेटवण्यासाठी कामी येत होता. अशा अनेक पुरोगामी विचारांची पेरणी करणाऱ्या या गावातील कोणतेही निर्णय हे एकोप्याने आणि सामंजस्यपणाने घेतले जात होते. त्यामुळे तंटामुक्त गाव म्हणूनही या गावाची एक ओळख तयार झाली होती. बेलापूर, शहाबाज, दिवाळे आणि आग्रोली अशी चार गावांची एक ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या या गावाचे भाऊसाहेब १९६५ सुमारास सरपंच झाले.

हर्डिलिया आणि १९७० नंतर आलेली सिडको, कोकण भवन यांसारख्या शासकीय कंपन्यांत गावातील काही ग्रामस्थांनी छोटय़ामोठय़ा नोकऱ्या पकडल्या, पण गावाचा विकास हा गावाची जमीन सिडकोने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाल्यानंतर झाला. त्यापूर्वी शेती, मिठागरावर काम करणे आणि मुबलक प्रमाणात भाजीची लागवड करण्यावर या गावाचा जास्त भर होता. त्यामुळेच या गावची भाजी थेट मुंबईत विक्रीला जात होती. महाशिवरात्री, हनुमान जयंती आणि चैत्र महिन्यात हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी होणारी गावची जत्रा हे गावाचे पारंपरिक उत्सव आजही मोठय़ा उत्साहात साजरे केले जात आहेत. गावाने घेतलेले ‘एक गाव एक गणपती’चा निर्णय हा गावच्या इतिहासातील सर्वात आनंदी दिवस, तर गतवर्षी गावात एकाच वर्षी विविध आजारांनी मृत्यू पावलेले बारा ग्रामस्थ हा दु:खद दिवस ग्रामस्थ सांगत आहेत. सध्या गावात मंदा म्हात्रे आणि सुरेश खाडे या दोन आमदारांचे वास्तव्य आहे हे विशेष.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of agroli village belapur
First published on: 13-04-2017 at 00:48 IST