सिडकोचे नियोजन; विक्री न झालेल्या जुन्या व नवीन घरांचा शोध

नवी मुंबई : राज्यातील करोना योद्धा आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी सिडकोने विशेष गृहनिर्माण योजना राबवली असून चार हजार ४८८ घरांसाठी सात हजार ४०० अर्ज आल्याने सर्व अर्जदारांना घर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी सिडको ऐरोली ते कळंबोलीमधील काही विक्री न झालेल्या जुन्या व नवीन घरांचा शोध घेत आहे.

सिडकोने आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी महागृहनिर्मिती सुरू केली असून याच वर्गातील ग्राहकांना घरे दिली जाणार आहेत. मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांचा सिडको या महागृहनिर्मितीत सध्या विचार करणार नसल्याचे समजते.

सिडकोने मागील दोन वर्षे पंतप्रधान आवास योजनेतील घरे व अल्प उत्पन्न गटासाठी महागृहनिर्मिती हाती घेतली आहे. एकूण ६५ हजार घरांपैकी सिडकोने सध्या २४ हजार घरे बांधण्यास सुरू केली असून त्यांची सोडत दोन वर्षांपूर्वी टप्याटप्याने काढण्यात आलेल्या आहेत. या घरातील ४४८८ घरे ही राज्यातील कोविड योद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेली आहेत. यातील १०८८ घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठी राखीव असून इतर ३ हजार ४०० घरे ही सर्वसाधारण प्र्वगासाठी आहेत. या घरांसाठी दोन लाख व अडीच लाख अनामत रक्कम ठेवण्यात आलेली आहे. कोविड योद्धा प्रमाणपत्र मिळण्यासाठी काही गणवेशधारी कर्मचारी व डॉक्टर, पोलिसांना विलंब लागत असल्याने सिडकोने मुदतवाढ दिली होती. सिडकोने या योद्धासाठी काही वित्त संस्थांशी चर्चा करून त्यांना कर्ज मिळण्याची सुविधादेखील उपलब्ध करून दिलेली आहे. या घरांसाठी सिडकोकडे अडीच हजारपेक्षा जास्त अतिरिक्त अर्ज आलेले आहेत. राज्यातील कोविड योद्धा व गणवेशधाऱ्यांनी मोठय़ा अपेक्षेने घर मिळावे यासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा सिडकोने निर्णय घेतला असून या  अर्जाच्या छाननीनंतर जे योद्धा व गणवेशधारी पात्र ठरणार आहेत, त्या सर्वानाच सिडको घरे देणार आहे. त्यासाठी सिडको शिल्लक जुन्या व नवीन घरांचा शोध घेत आहे.

कोविड योद्धा व गणवेशधाऱ्यांसाठी सिडकोने तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली, द्रोणागिरी, या पाच नोड मध्ये ही घरे राखीव ठेवलेली आहेत. यात काही घरे ही राखीव संर्वगासाठी ठेवण्यात आलेली आहेत. मागील महिन्यात सात ऑक्टोबपर्यंत या घरांसाठी राज्यातील कोविड योद्धा व गणवेशधाऱ्यांसाठी मुदत होती. त्यात सात हजारांपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. सिडकोने केवळ ४४८८ घरे आरक्षित ठेवलेली आहेत. इतर कोविड योद्धे त्यामुळे नाराज होणार होते. इतर ग्राहकांप्रमाणे सिडको या अर्जदारांची छाननी करीत आहे. त्यात काही अर्जदार बाद होण्याची शक्यता आहे.

नवीन सोडत नवीन वर्षांत?

सिडकोने दिवाळीत आणखी चार हजार घरांची सोडत काढणार असल्याचे जाहीर झाले होते. मात्र सर्वात अगोदर कोविड योद्धा व गणवेशधारी अर्जदारांना घरांचा ताबा अथवा इरादा पत्र दिल्यानंतरच सिडको नवीन सोडतीचा विचार करणार आहे. कोविड योद्धय़ांना प्राधान्य देण्यात आल्याने ही सोडत आता नवीन वर्षांत होण्याची शक्यता आहे. या सोडतीतही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटाला प्राधान्य दिले जाणार आहे.

सिडकोने १५ ऑगस्ट रोजी राज्यातील कोविड योद्धा व गणवेश धारी कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. या योजनेत अर्ज केलेल्या जास्तीत जास्त अर्जदारांना घर मिळावे असे सिडकोचे प्रयत्न असल्याने राखीव घरांपेक्षा जास्त आलेल्या अर्जदारांनाही घर देण्याचा सिडकोचा निर्णय आहे.

डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको