नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोने जाहीर केलेल्या तळोजा नोडमधील ५ हजार ७३० व गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गेली अनेक वर्षे आरक्षणामुळे विक्रीविना शिल्लक राहिलेल्या ७७८ अशा एकूण ६ हजार ५०८ घरांची सोडत शुक्रवारी सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयात जाहीर करण्यात आली. त्यामुळे सहा हजार नागरिकांचे महामुंबई क्षेत्रातील घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या सोडतीत १९०५ घरे ही आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांकरिता व ४६०३ घरे ही सर्वसाधारण प्र्वगाकरिता राखीव होती. सिडकोची ही सोडत माजी लोकायुक्त सुरेश कुमार यांच्या पर्यवेक्षणाखाली स्थापन झालेल्या समितीच्या देखरेखेखाली काढण्यात आली आहे.
सिडकोने महागृहनिर्मितीचा संकल्प सोडला आहे. महामुंबई क्षेत्रात सुमारे एक लाख दहा हजार घरे येत्या काळात बांधली जाणार आहेत. त्यांचे बांधकाम आणि सोडत ही प्रक्रिया एकाच वेळी केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी सिडकोने सहा सोडतीद्वारे २४ हजार घरांच्या सोडती काढलेल्या आहेत. यानंतर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झपाटय़ाने विकसित होणाऱ्या तळोजा नोडमध्ये ५,७३० घरांची विक्री २६ जानेवारीपासून सुरू केली होती. नवीन वर्षांतील ही पहिलीच गृह विक्री व सोडत आहे. या घरांसाठी तीस हजारांपर्यंत अर्ज आले होते. त्यांची सोडत ठरलेल्या कार्यक्रमानुसार ८ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली होती. याच वेळी गुढीपाडव्यांच्या मुहूर्तावर सिडकोच्या विविध जुन्या गृह योजनेतील शिल्लक घरांची सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखविल्यानतंर ही गृह अर्ज विक्री गुढीपाडव्याच्या मुर्हतावर सुरू करण्यात आली. मात्र या दोन्ही गृहनिर्माण योजनांची सोडत ८ एप्रिल रोजी सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयात काढण्यात आली. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक, अश्विन मुदगल, कैलाश शिंदे, मुख्य दक्षता अधिकारी डॉ.शशिकांत महावरकर, महाव्यवस्थापक फैय्याज खान, यांच्यासह सिडकोचे अनेक संबधित अधिकारी उपस्थित होते.
या सोडतीसाठी माजी लोकायुक्त सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीव्यतिरिक्त अर्जदारांपैकी संतोष पिंपळे, मधुकर पिसाळ आणि राजेश चव्हाण हे अर्जदार उपस्थित होते. या सोडतीत घर मिळालेल्या अर्जदारांनी आनंद व समाधान व्यक्त केले. सिडकोने विकसित केलेल्या नवी मुंबईत घर मिळाल्याचा आनंद या लाभार्थीच्या चेहऱ्यावर होता. सिडकोने या सोडतीसाठी वापरलेली संगणक प्रणाली ही प्रोबेटी सॉफ्ट या पुण्यातील कंपनीचे असून सदर प्रक्रिया ही मानवविरहित आहे. ही प्रक्रिया आयआयटीच्या संगणक विभागाकडून तपासून घेण्यात आली आहे. ही सोडत अंत्यत पारदर्शक पध्दतीने झाल्याचा दावा सिडकोने केला आहे. लाभाथींची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. सिडको सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यास कटिबध्द असल्याचे डॉ.मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
सध्याची महागाई आणि आर्थिक मंदीच्या काळात सिडकोची किफायतशीर घरे ही सर्वसामान्यांना परवडणारी आहेत. त्यामुळे सिडकोच्या या योजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सिडकोच्या वतीने उभारण्यात येत असलेले विमानतळ आणि इतर अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे नवी मुंबईमध्ये घराचे स्वप्न पूर्ण झालेल्या लाभार्थीना घरांची केलेली गुंतवणूक ही फायदेशीर ठरणार आहे. -एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री, राज्य
