scorecardresearch

विजेविना होरपळ; तांत्रिक बिघाडामुळे महामुंबईत दुपारपर्यंत वीजपुरवठा खंडित

तापमानाचा पारा आधीच चाळीशीपार गेल्याने दुपारी शहरात अघोषित संचारबंदीचे वातावरण आहे.

नवी मुंबई : तापमानाचा पारा आधीच चाळीशीपार गेल्याने दुपारी शहरात अघोषित संचारबंदीचे वातावरण आहे. त्यात गुरुवारी सकाळपासून वाशी, कोपरखैरणे परिसरात जनित्र जळाल्याने तर पनवेल व नेरुळ परिसरात महापारेषणच्या मुख्य वीजवाहिनीत बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुपापर्यंत हळूहळू वीजपुरवठा पूर्ववत झाला. मात्र यामुळे नवी मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली.घरात वीज नसल्याने नागरिकांना उद्यानांचा आसरा घ्यावा लागला. वीज नसल्याने लघुउद्योजकांनाही फटका बसला.
वाशी येथील वीजपुरवठा केंद्रातील जनित्रात तांत्रिक बिघाड झाल्याने वाशी व कोपरखैरणे परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. पाच तासांच्या दुरुस्ती कामानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. तर महापारेषणच्या तळेगाव ते नेरुळ या मुख्य वीजवाहिनीत बिघाड झाल्याने नेरुळसह पनवेल परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता.
तापमान वाढीमुळे सध्या विजेची मागणी वाढली आहे. त्यात गेली काही दिवस नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरात वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत आहे. त्यामुळे वीज ग्राहक त्रस्त आहेत. त्यात गुरुवारी वीजपुरवठय़ातील तांत्रिक बिघाडामुळे बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे दुपापर्यंत विजेविना राहावे लागल्याने वीजग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
वाशी सेक्टर २९ येथील विद्युत जनित्र सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने जळाले. त्यामुळे महावितरणने तातडीने दखल घेत या केंद्रावरून होत असल्याला भागाचा वीजपुरवठा खंडित केला. दोन तासांत दुरुस्ती करीत जनित्र बसवण्यात आले. मात्र यात महावितरणने पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही यात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाशी सेक्टर २६,२८,२९ व १५ चा काही भाग तसेच वाशी स्टेशन परिसरातील सेक्टर १६ व १७ यासह कोपरखैरणे विभागातील बोनकोडे, खैरणेगाव, सेक्टर १ ते ११ या परिसरात सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. सुमारे पाच तासांनंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला.
तळेगाव ते खारघर अशी महापारेषणची ४०० मेगावॉटची मुख्य वीजवाहिनी असून त्यात तांत्रिक बिघाड (ब्रेक डाऊन) झाल्याने पनवेल परिसरातीत काही ठिकाणी सकाळी ११ ते १२ तर काही ठिकाणी दुपारी दोन ते तीन दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. कामोठे येथील ३३ मेगावॉटच्या वीजवाहिनीतही बिघाड झाल्याने कामोठे खारघर, नेरुळ, बेलापूर येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
२८ एप्रिल रोजीही पडघा येथील विद्युत पारेषण केंद्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दीड ते तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभाल दुरस्ती कारणास्तव वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीजग्राहक त्रस्त आहेत.
शीतपेयांची मागणी घटली
तापमान वाढल्याने शीतपेय, आईस्क्रीम यांची मागणी वाढली आहे. गुरुवारी मात्र दुपापर्यंत वीज नसल्याने या विक्रेत्यांना याचा फटका बसला. शीतपेय थंडगार नसल्याने मागणी रोडावली तर आईस्क्रीम व दुग्धजन्य पदार्थ खराब झाल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा सुरळीत
नवी मुंबईत बहुतांश ठिकाणी दुपापर्यंत वीज खंडित झाली होती. मात्र याचा पाणीपुरवठय़ावर काहीही परिणाम झाला नाही. भोकारपाडा येथे वीजपुरवठा खंडित झाला नव्हता. तसेच पाण्याच्या टाक्या भरलेल्या असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होता, असे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.
रुग्णालयांत पर्यायी व्यवस्था
वीजपुरवठा खंडित झाला तर महापालिका रुग्णालयात पर्यायी व्यवस्था म्हणून बॅटरीवर बॅक अप असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचा काही परिणाम झाला नाही. नियमित अ सर्व सेवा सुरळीत सुरू होत्या, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितली.
वाशी येथील जनित्र जळाल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. या कामासाठी दोन तासांचा कालावधी लागला. मात्र दरम्यान पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही करून घेण्यात आली. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास थोडा उशीर झाला. – ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

महापारेषणच्या वीजवाहिनीत बिघाड झाल्याने पनवेल परिसरात तातडीचे भारनियमन करण्यात आले. मात्र एकाच वेळी वीजपुरवठा खंडित न करता नोडनुसार एक एक तासाचे भारनियमन करण्यात आले.-सतीश सरोदे, कार्यकारी अभियंता, महावितरण

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horpal without electricity power outage mumbai till technical glitch amy

ताज्या बातम्या