पनवेल : पनवेल तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २९६ पार झाली आहे. असे असले तरी शहरात करोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. गुरुवारी पनवेल तालुक्यात एकाच दिवशी ९९ करोनाग्रस्त आढळले. यामध्ये पालिका क्षेत्रात ८२ तर ग्रामीण भागात १७ रुग्ण होते. तसेच तालुक्यातील एकूण करोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या पालिका क्षेत्रात २४८ तर ग्रामीण भागात ४८ वर पोहचली आहे. तालुक्यात गुरुवारी २९६ करोनाग्रस्त उपचार घेत होते. यामध्ये घरून उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या तेरा दिवसांत पालिका क्षेत्रात ३१३ तर ग्रामीण पनवेलमध्ये ८५ करोनाग्रस्त आढळले. तालुक्यात १३ दिवसात सुमारे चारशे रुग्ण वाढले आहेत.

गेल्या सात दिवसांत पनवेल शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली आहे. रायगड जिल्ह्याच्या तुलनेत पनवेल तालुक्यात सर्वाधिक करोनारुग्ण आहेत. गेल्या १३ दिवसांत पनवेल तालुक्यात एकाही रुग्णाचा करोनाने मृत्यू झालेला नाही हीच दिलासा देणारी बाब आहे.

मुखपट्टी लावणे सरकारने बंधनकारक केले नसले तरी नागरिकांनी स्वत:ची खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखपट्टीचा जरूर वापर करावा. प्रशासनाने हर घर दस्तक मोहीम हाती घेतली असून लसीकरण सुरू केले आहे. ७० पथक लसीकरणाचे काम करीत आहेत. गेल्या चार दिवसांत चारशेहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले.

डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पनवेल पालिका