विकास महाडिक
नेरुळ येथील जिम्मी पार्क इमारतीच्या दिवाणखान्यातील सिमेंटचा थर (स्लॅब) मागील आठवडय़ात पत्त्यांप्रमाणे कोसळला. यात इमारतीतील रहिवाशांनी केलेले फेरफार हे एक कारण पुढे येत आहे. नवी मुंबईतील सहा हजार इमारतींपैकी अशा प्रकारच्या सुमारे सातशे ते आठशे इमारती आहेत. ज्या जर्जर झाल्या असून त्यांच्यात करण्यात आलेल्या अंतर्गत फेरफार व बांधकामामुळे तेथील बांधकाम कोणत्याही क्षणी कोसळू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेरुळ येथील जिम्मी पार्क इमारतीच्या दिवाणखान्यातील सिमेंटचा थर (स्लॅब) मागील आठवडय़ात पत्त्यांप्रमाणे कोसळला. या दुर्घटनेत येथील रहिवाशांपैकी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सात रहिवाशी जखमी झाले आहेत. जखमी रहिवाशांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मृत्यू पावलेल्या तरुणाने जेवण मागविले होते. जेवन घेऊन आलेला हॉटेलचा तरुण इमारतीच्या प्रवेशद्वारावरून मोबाइल फोन करीत होता. त्याच वेळी ही दुर्घटना घडली. त्यामुळे तरुण रहिवाशाला शेवटचे जेवनही घेता आले नाही. याला जबाबदार कोण? पालिकेने या दुर्घटनेच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात कंत्राटदार व विकासक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या २८ वर्षांत या इमारतीत अनेक रहिवाशांनी अंर्तगत फेरफार केलेले आहेत. अशाच प्रकारचा फेरफार सहाव्या मजल्यावरील रहिवाशी करीत असताना ही दुर्घटना घडलेली आहे. इमारत इतकी कमकुवत झाली होती की सहाव्या मजल्यावरील स्लॅब कोसळत तळमजल्यापर्यंत आला होता. या इमारतीच्या बांधकामासाठी २८ वर्षांपूर्वी वापरण्यात आलेले बांधकाम साहित्य हे अतिशय तकलादू व निकृष्ट होते. हे सिध्द होत आहे. त्यामुळे ही इमारत हे फेरफार सहन करू शकली नाही. एका तरुण मुलाला नाहक आपला जीव गमवावा लागला. भावी संकटांची चाहूल देणारा हा एक संदेश आहे.

नवी मुंबई हे शहर मुळात खार जमिनीवर मातीचा भराव टाकून उभारण्यात आले आहे. त्यामुळे इमारतींच्या पायात खाऱ्या पाण्याचे झरे आहेत. पाच ते सहा फुटांपर्यंत खोदल्यास नवी मुंबईत खाऱ्या पाण्याची तळी लागतात. ऐरोली येथील नाटय़गृहाचा भूखंड अशाच खाऱ्या पाण्याचा तलाव झाला आहे. खाडीकिनारी असलेल्या या नगरीतील प्रत्येक इमारत ही तीस ते चाळीस वर्षांनंतर जर्जर झाली आहे. खाऱ्या पाण्याच्या हवामानामुळे इमारतीतील लोखंडी सळय़ा गंजलेल्या आहेत. चाळीस वर्षांपूर्वीच्या बांधकामासाठी उलवा आणि कळवा खाडीची खारेपाणीमिश्रित वाळू वापरण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक जुन्या इमारतींच्या प्लास्टरचे पापुद्रे निघत असल्याचे दिसून येतात. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ येथील इमारतींना हा धोका जास्त आहे.

सिडकोने बांधलेल्या इमारती तर या निकृष्ट बांधकामांचा उत्कृष्ट नमुना आहे. नेरुळमधील ही जिम्मी पार्क नावाची इमारतही अशाच प्रकारे जर्जर झाली आहे. त्यात येथील रहिवाशांनी केलेला अंर्तगत फेरफार या इमारतीचा सिमेंटचा थर कोसळण्यास कारणीभूत झाला आहे. पालिकेकडून या इमारतीला संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याची नोटीस देण्यात आली आहे. या इमारतीच्या दुर्घटनेस विकासकाबरोबर येथील रहिवाशीदेखील तेवढेच जबाबदार आहेत. ही एक सुरुवात आहे.

नवी मुंबईतील सहा हजार इमारतींपैकी अशा प्रकारच्या सुमारे सातशे ते आठशे इमारती आहेत. ज्या जर्जर झाल्या असून त्यांच्यात करण्यात आलेल्या अंतर्गत फेरफार व बांधकामामुळे तेथील बांधकाम कोणत्याही क्षणी कोसळू शकते. गृहनिर्माण कायद्यानुसार प्रत्येक इमारतीचे पंधरा वर्षांनंतर दर पाच वर्षांनी संरचनात्मक लेखापरीक्षण करणे (स्ट्रक्चरल ऑडिट) बंधनकारक आहे. पण नवी मुंबईतील एकाही इमारतीने किंवा गृहनिर्माण संस्थेने अशा प्रकारचे दर पाच वर्षांनी संरचनात्मक लेखापरीक्षण केलेले नाही. जिम्मी इमारतीसारख्या घटना घडल्यानंतर काही काळ या संरचनात्मक लेखापरीक्षणाची तुतारी वाजवली जाते. काही इमारतीतील रहिवाशांनी अंर्तगत फेरफारचा कळस गाठला असून इमारतींचे खांब स्थलांतरित केलेले आहेत. दरवर्षी अतंर्गत फेरफार करणारे काही रहिवाशी असून वास्तुशास्त्रानुसार दिवाणखाणा, शौचालय यांच्या रचनेत बदल करीत असल्याचे आढळून आले आहे. हा फेरफार पालिकेची परवानगी घेऊन करणे कायद्याने बंधनकारक आहे, पण अनेक रहिवासी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पटवून काही रक्कम संस्थेला देणगी स्वरूपात देऊन हा कायापालट करीत आहेत. पालिकेचे या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. पदाधिकारी देखील या गुन्ह्यावर पांघरून घालत आहेत. त्यामुळे अशी दुर्घटना झाल्यानंतर रहिवाशी व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. एखाद्या अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिल्यास स्थानिक नगरसेवकाचा हस्तक्षेप यात हमखास होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे नवी मुंबईत भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या किंवा काही प्रमाणात भोगवटा प्रमाणपत्र असलेल्या शे- दोनशे इमारती नक्कीच आढळून येत आहेत. निकृष्ट बांधकाम, रहिवाशांचे फेरफार, पदाधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे नवी मुंबईतील अध्र्या इमारती या जिम्मी पार्कच्या मार्गावर आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

त्यामुळे पालिकेने नवी मुंबईतील सर्वच इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. हे परीक्षण लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कायद्याचा आधार घेऊन संरचनात्मक लेखापरीक्षण न करणाऱ्या इमारतींना मालमत्ता कराच्या पाचपट दंड ठोठावण्याची तरतूद हवी आहे. इमारतींना केवळ रंगरंगोटी करून संरचनात्मक लेखापरीक्षणाचा खर्च टाळणाऱ्या रहिवाशांची संख्या जास्त आहे. अशा रहिवाशांना इमारतीचे भविष्यात बरे-वाईट झाल्यास जबाबदार धरण्याची आवश्यकता आहे. शहरी भागातील इमारतींची ही दुर्दशा आहे. या उलट ग्रामीण भागातील बेकायेदशीर इमारतींचा पाया व कळस दोन्ही कमकुवत असल्याने या इमारती येत्या काळात कोसळल्यास मुंब्रा येथील लकी कंपाऊंडसारख्या दुर्घटना घडण्यास केवळ वाट पाहिली जात आहे. नवी मुंबई पालिकेने या जिम्मी पार्क प्रकरणावरून काही बोध घेऊन सर्वच इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून ठेवावे जेणेकरून पालिकेची ही जमेची बाजू ठरणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hundreds jimmy parks town cement slab collapses local police station contractor developer crime amy
First published on: 21-06-2022 at 00:05 IST