हाइड पार्क सेक्टर ३५, खारघर

आधुनिकता आणि पर्यावरण या दोहोंचा समतोल साधण्याचा प्रयत्न खारघरमधील हाइड पार्क या संकुलात दिसतो. येथे गगनचुंबी इमारती आणि हिरवाई, वृक्षवेली एकत्र नांदताना दिसतात. वृक्षारोपण, दत्तक वृक्ष योजना असे उपक्रम या वृक्षप्रेमी संकुलात नियमितपणे राबवले जातात.

खारघर शहरात अनेक गगनचुंबी इमारती आहेत. याच परिसरात सेक्टर ३५ येथे चार वर्षांपूर्वी हाइड पार्क हे संकुल उभारण्यात आले. येथील १२ इमारतींत ७२६ सदनिका आहेत. खारघरमध्ये शहरीकरण होताना वृक्षांचा मात्र ऱ्हास होत गेला. येथील सेक्टर ३० ते ३५ या परिसरात मोजून १८ मोठी झाडे उरली होती. वाढते शहरीकरण आणि प्रदूषण याचा आरोग्यावर आणि पुढील पिढय़ांवर दुष्परिणाम होऊ नये म्हणून येथील रहिवाशांनी परिसरातील हिरवाई वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

परिसरात वृक्षसंवर्धन व्हावे या हेतूने या संकुलातील रहिवाशांनी संकुलालगत एकूण ३०० झाडे लावली आणि दत्तक झाडे योजना राबिविली. संकुलातील प्रत्येकाला एका झाडाच्या संवर्धनाची जबाबदारी सोपविण्यात आली. काही रहिवाशांनी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस अशा खास दिवशी वृक्षरोपण केले. संकुलातील रहिवासी दररोज सकाळी ७ ते ८ दरम्यान झाडांना पाणी घालतात. त्या झाडांना खत मिळावे, त्यांची योग्य देखभाल राखली जावी, चांगली माती मिळावी यासाठी सर्वजण १०० ते २०० रुपये काढतात.

वृक्षारोपणाचा आणि वृक्षसंवर्धनाचा उपक्रम मार्गी लावल्यानंतर संकुलातील रहिवाशांनी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या पुरेपूर वापरासाठी प्रयत्न सुरू केले. आवारात सौर दिवे बसविण्यात आले. तसेच सौर हीटर बसविण्यात आल. सोसायटीचे स्वत:चे स्वतंत्र सांडपाणी प्रकिया केंद्र आहे. यामुळे बाहेरील प्रदूषणाला थोडय़ा प्रमाणात आळा बसला आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी संकुलातील उद्याने व इतर घरगुती कामांसाठी वापरले जाते.

पर्यावरणाचे रक्षण करतानाच येथील रहिवाशांनी संस्कृती जपण्याचे प्रयत्नही सुरू ठेवले आहेत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गुढीपाडव्याला संकुलापासून ते शिल्पचौकापर्यंत नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. या शोभायात्रेतूनही विविध सामाजिक संदेश पोहोचवले जातात. यंदा शोभायात्रेत १५० मुलांनी अवयव दान, नेत्रदानाचा संदेश दिला. पर्जन्यजल संधारणाची सोय आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे, सौर ऊर्जेवरील वॉटर हीटरचा वापर येथे करण्यात येतो. पनवेल विभागात अद्याप ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून जैविक खत निर्मितीवर जास्त भर देण्यात आलेला नाही, मात्र या संकुलाने कचरा वर्गीकरण करून खत निर्मितीसाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

टॉवर कार पार्किंग

खारघर शहरात वाहन पार्किंगची समस्या गंभीर होत आहे. या संकुलात खुले कार पार्किंग उपलब्ध आहे. मात्र भविष्यात वाहन पार्किंगचा प्रश्न जटिल होण्याची शक्यता विचारात घेता, टॉवर कार पार्किंगही उपलब्ध करण्यात आले आहे. या ठिकणी १०२ वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.