पनवेल – ऑनलाईन फसवणूक करणा-या भामट्यांनी उच्चशिक्षितांना लक्ष्य करत आहेत. आयसीआयसीआय बॅंकेच्या उपाध्यक्षांना टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करुन तब्बल एक कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना कामोठे येथे घडली आहे. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात रितसर २९ जुनला दुपारी दुपारी सव्वातीन वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

सायबर चोरट्यांपासून वाचा आणि जास्त नफ्याच्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन वारंवार पोलिसांकडून केले जाते. तरी उच्चशिक्षित मंडळी चोरट्यांनी समाजमाध्यमांवर लावलेल्या सापळ्यात अडकून स्वताची फसवणूक करुन घेत आहेत. नवी मुंबईतील आयसीआयसीआय बॅंकेच्या उच्चपदी काम करणारे ४० वर्षीय व्यक्ती कामोठे येथे शितलधारा इमारतीमध्ये राहतात.

पिडीत व्यक्तीला अनलीस्टेड शेअर या टेलीग्राम ग्रुपवर सहभागी करुन घेतल्यावर भामट्यांनी ११ मे ते ९ जुन या दरम्यान वेगवेगळ्या नावावरुन फोनवरुन संपर्क साधला. प्रेफर आयटी सोल्यूशन नावाच्या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून पिडीत व्यक्तीचा विश्वास संपादन केल्यानंतर पिडीताचे आधारकार्ड व पॅनकार्ड आणि डीमॅट खात्याची माहिती या भामट्यांनी मिळवली. याच माहितीच्या साह्याने भामट्याने अवघ्या २८ दिवसात एक कोटी ४८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायबर चोरी रोखण्यासाठी वारंवार पोलीसांचे पथक विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन नागरिकांच्या बैठका घेऊन दामदुप्पट योजनांच्या फसव्या जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन करीत आहे. तरी उच्चशिक्षित नागरिक फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करुन त्यांची फसगत होत आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्तांनी नागरिकांच्या सतर्कतेसाठी व्हॉट्सअॅप चॅनल सुरू केले आहे. नागरिकांनी ऑनलाईन येणा-या जाहिरातीची शहनिशा करुनच त्यांच्या आयुष्य भराची रकमेची गुंतवणूक करावी.- विमल बिडवे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, कामोठे पोलीस ठाणे</p>