नवी मुंबई : आयडीबीआय बँकेच्या प्रस्तावित खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी बेलापूर येथील अर्बन हार्ट परिसरात निषेध आंदोलन केले. केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (एलआयसी) आयडीबीआय बँकेची विक्री करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय देशव्यापी आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनात नवी मुंबई आणि परिसरातील सुमारे १५० ते २०० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज या संघटनेने २ आणि ३ नोव्हेंबर रोजी देशभरातील बँकेच्या शाखा व कार्यालयांमध्ये दोन दिवसीय उपोषण आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचाच भाग म्हणून बेलापूर येथे हे आंदोलन करण्यात आले. बँकेचे खासगीकरण थांबवावे, केंद्र सरकारने बँकेतील किमान ५१ टक्के भागभांडवल कायम ठेवण्यासाठी आणखी सहा टक्के भागभांडवल खरेदी करावे, तसेच कर्मचाऱ्यांच्या विद्यमान सेवा अटी, निवृत्तिवेतन, कल्याणकारी योजना आणि आरक्षण धोरणाचे संरक्षण करावे, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत.

बँकेचे खासगीकरण झाल्यास सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून तिचे स्वरूप संपुष्टात येईल. त्याचा परिणाम ठेवीदार, शेतकरी, लघुउद्योजक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या रोजगाराच्या सार्वजनिक क्षेत्रातील स्वरूपाचे संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.