नवी मुंबई : शहरात सुरू असलेल्या मालमत्तांच्या लिडार सर्वेक्षणाला गती देत पुढील आर्थिक वर्षांतील मालमत्ता देयके या नव्या सर्वेक्षणानुसारच देण्यात येणार आहेत. त्यासाठी हे सर्वेक्षण वळेत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक लिडार तंत्रज्ञान वापरून सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाचे हे काम पूर्ण होण्यासाठी पालिका आयुक्त लक्ष ठेवून आहेत. याबाबत बैठक घेत त्यांनी वरील आदेश दिले.
मालमत्तांचे लिडार तंत्रज्ञानाद्वारे दोन प्रकारे सर्वेक्षण केले जाणार आहे. यातील पहिल्या प्रकारचे प्रत्यक्ष जागी जाऊन मोबाइल व्हॅनद्वारे अर्थात टेरिस्टल लिडार सर्वेक्षणाचे काम सद्य:स्थितीत प्रगतिपथावर असून ७० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच दुसरे ड्रोनद्वारे आकाशातूनही सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी शासनाच्या आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत. आता स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी आवश्यक असून ती प्राप्त होण्याकरिता अतिरिक्त शहर अभियंता यांनी प्राधान्याने पाठपुरावा करून परवानगी जलद प्राप्त करून घ्यावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले.
मालमत्ता कर देयके या सर्वेक्षणाच्या आधारे प्रॉपर्टी सव्‍‌र्हे अॅीनालिसिस प्रोजेक्टद्वारे करण्याचे निर्देश त्यांनी मालमत्ता कर विभागास दिले. त्यासाठी आवश्यक नकाशे तसेच बांधकाम परवानगी प्रमाणपत्र (सीसी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) याची माहिती जलद उपलब्ध करून देण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले आहेत.
लिडार सर्वेक्षणाचे काम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हे काम पूर्ण क्षमतेने व निश्चित कालावधीत गुणवत्ता राखून पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले आहेत. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
१२ ठिकाणी ‘बेस स्टेशन’
सर्व जीआयएस डाटा अचूकपणे प्राप्त होण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १२ ठिकाणी बेस स्टेशन मार्किंगसाठी ग्राऊंड कंट्रोल पॉइंट बसविण्यात येत आहेत. सात ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. पाच ठिकाणची कामे प्रगतिपथावर आहेत. याद्वार मोबाइल लिडार व ड्रोन सव्‍‌र्हेद्वारे प्राप्त छायाचित्र यांच्या जिओ रेफरन्सकरिता उपयोग होऊन सर्व जीआयएस डाटा अचूकपणे प्राप्त होणार आहे.