दिवसाला १२०० ते १५०० रुग्णांच्या विविध तपासण्या; डॉक्टर व परिचारिकांची कमतरता असल्याने गैरसोय

नवी मुंबई : गेल्या वर्षी करोना समर्पित केलेले महापालिकेचे वाशीतील सार्वजनिक रुग्णालय दुसऱ्या लाटेपासून इतर रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी रुग्णांचा भार वाढला आहे. दिवसाला १२०० ते १५०० रुग्णांच्या विविध तपासण्या व उपचार या रुग्णालयात केल्या जात आहेत. पालिकेने ऐरोली व नेरुळ येथील सार्वजनिक रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू केली असली तरी वाशी येथील रुग्णालयाला पर्याय नाही असे दिसून येत आहे.

महामुंबईतील गरीब, गरजू रुग्णांबरोबरच आजूबाजूच्या मानखुर्द, गोवंडी, देवणार, मुंब्रा, शिळफाटा या उपनगरातील रुग्ण वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाला पसंती देत असल्याने रुग्णांत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे करोना काळात पालिकेने शेकडो डॉक्टर व परिचारिका यांची नियुक्ती केल्या आहेत तरीही या रुग्णालयात आजही डॉक्टर व परिचारिका यांची उणीव भासत असल्याने या रुग्णालयाला सापत्नाची वागणूक मिळत असल्याचे चित्र आहे.

करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नवी मुंबई पालिकेचे  वाशी सार्वजनिक रुग्णालय पूर्ववत करण्यात आले. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून त्याचे र्निजतुकीकरण करण्यात आले. तोपर्यंत कोविडचा सामना करण्यासाठी शहरात कोविड काळजी केंद्र, समर्पित रुग्णालये तयार करण्यात आली होती. राज्यात सर्वाधिक विशेष खासगी रुग्णालये नवी मुंबईत आरोग्य सेवा बजावत असल्याने दिल्लीपासून भिवंडीपर्यंतचे अनेक रुग्ण या काळात नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते, मात्र कोविडसाठी कोटय़वधी रुपये खर्च केल्यानंतर उभारण्यात आलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे वाशी येथील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाकडे आता दुर्लक्ष झाले आहे असे दिसून येते. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे नवी मुंबई पालिकेनेही कोविड रुग्णालयांना महत्त्व देताना इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या सार्वजनिक रुग्णालयांना सापत्नाची वागणूक दिली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सर्व आरोग्य यंत्रणा कोविड साथीचा निर्मूलन कार्यक्रम राबवीत असताना इतर अनेक आजारांनी उपचार घेणाऱ्या सार्वजनिक रुग्णालय मात्र अनेक अडचणींचा सामना करीत आहे. पालिकेचे वाशी येथील रुग्णालयात विविध उपचारासाठी आवश्यक असलेले सुमारे चाळीस ते पन्नास डॉक्टरांची आज कमतरता जाणवत आहे. विशेष म्हणजे पालिकेने मेगा भरती करून कोविड काळात शेकडो डॉक्टरांची वर्णी आरोग्य सेवेत लावलेली आहे. करोना साथ संपुष्टात येत नाही तोपर्यंत हे डॉक्टर पालिकेच्या सेवेत असून त्यांच्यावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. करोनाची पहिली व दुसरी लाट ओसरल्याने अनेक कोविड काळजी केंद्र व रुग्णालये बंद करण्यात आलेली आहेत. अशा वेळी ते डॉक्टर, परिचारिका, साफसफाई कामगार यांची सेवा पालिकेच्या या सर्वात मोठय़ा रुग्णालयात वळविणे आवश्यक होते, पण प्रशासनाने त्याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे पालिकेच्या या सार्वजनिक रुग्णालयात अनेक रुग्ण हे संबंधित डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचार घेऊ शकत नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकही न्यूरोसर्जन तर पालिकेला सेवा देण्यास तयार नाही. त्यामुळे पालिका सेवेत डॉक्टर उपलब्ध असताना रुग्णालयात डॉक्टरांची कमी असे विदारक चित्र सध्या नवी मुंबईत दिसून येत आहे. जे डॉक्टर उपलब्ध आहेत त्यात तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या पोस्ट ग्रज्युएशन करणाऱ्या डॉक्टरांची संख्या जास्त आहे. कोविड काळात नेमण्यात आलेले डॉक्टर हे केवळ तिसऱ्या लाटेच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.( या भरतीत सर्वाधिक नाक कान घसा तपासणारे डॉक्टरांची संख्या जास्त आहे) पावसाळ्यात पालिकेच्या या रुग्णालयात सर्वाधिक बाह्य़ रुग्ण उपचारासाठी येत असतात ही संख्या जुलै व ऑगस्ट दरम्यान दोन ते अडीच हजारांच्या घरात दिवसागणिक जात असल्याचे दिसून येते. सध्या पाउसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे ही संख्या बाराशे ते दीड हजाराच्या घरात आहे. ती आता वाढण्याची शक्यता आहे. तीनशे रुग्णशय्येच्या रुग्णालयात वाढत्या रुग्णसंख्येसाठी जमिनीवर गादया टाकून उपचार करण्याची वेळ या रुग्णालयावर येत आहे.

‘तारीख पे तारीख’

कोविड काळात भरती करण्यात आलेले डॉक्टर हे या पालिका रुग्णालयात सेवा देण्यास तयार नाहीत. कोविड सुरु झाल्यानंतर इतर आजारांकडे दुर्लक्ष केले जात आहेत. त्यामुळे पालिका रुग्णालयात रुग्णांना तारीख पे तारीख मिळत आहे.  त्यामुळे कोटय़ावधी रुपये खर्च करून आरोग्य सेवेच्या नावाने चांगभल आहे.

रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व इतर आरोग्य कर्मी संख्या आहे. कोविड काळात भरती करण्यात आलेले डॉक्टर हे करोनासाठी आहेत. या रुग्णालयात पालिका डॉक्टरांबरोबरच तेरणा वैद्यकिय महाविद्यालयांतील डॉक्टरांची सेवा देण्यात आलेली आहे. या रुग्णालयात न्यूरोसर्जन नाहीत ही बाब  सत्य आहे, मात्र इतर विभागात अनेक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

-डॉ. धनवंत घाडगे, मुख्य वैद्यकिय अधिकारी, नवी मुंबई पालिका