मोरा सागरी पोलीस ठाण्याकडे सुरक्षा साधनांचा अभाव, गस्ती बोटी गायब

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उरणला समुद्रकिनारा असून २६-११ च्या घटनेनंतर हा किनारा संवेदनशील मानला जात आहे. मोरा येथे सागरी पोलीस ठाणेही सुरू करण्यात आले आहे. मात्र सागरी सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य नाही. एक गस्ती बोट देण्यात आली होती. तीही आता नाही. त्यामुळे गस्तही थांबली आहे. त्यामुळे येथील सुरक्षा धोक्यात आली आहे.  १९९३-९४ च्या बॉम्ब हल्ल्यातही उरणची चर्चा झाली होती. २६-११ च्या घटनेनंतरही उरणशी धागेदोरे जोडले होते. असे असतानाही येथील सुरक्षेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने येथील केंद्र सरकारच्या अतिसंवेदनशील प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

उरण तालुका हा सागरी किनारा तसेच खाडीच्या मुखांवर वसलेला आहे. त्यामुळे जलमार्गाने सहजरीत्या उरणमधील कोणत्याही भागात प्रवेश केला जाऊ शकतो. त्यामुळे यापूवीर्ही उरणमधील खाडी किनाऱ्यावर होणारी तस्करी परिचित आहे. आजही काही प्रमाणात खाडी किनाऱ्यावरून संशयास्पद व्यवसाय होत असल्याचे उघड झाले आहे. तालुक्याला  दहा ते बारा किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा आहे. यामध्ये मोरा व करंजा ही दोन मासेमारी बंदरे आहेत. तर केगांव व पिरवाडी हे दोन समु्द्र किनारे आहेत. त्यामुळे सागरी मार्गाने होणाऱ्या दहशतवादी कारवायांनंतर उरणमध्ये मोठय़ा प्रमाणात तपास सत्र चालविले गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या हल्ल्यानंतर किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आलेली होती. 

देशातील महत्त्वाचे व अतिसंवेदनशील प्रकल्प उरणमध्ये आहेत. यात अरबी समुद्रात आढळलेल्या तेल विहिरीतील तेल साठय़ावर प्रक्रिया करणारा ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प पिरवाडी येथील समुद्र किनाऱ्यावर आहे. तर याच प्रकल्पावर आधारित वायूपासून वीजनिमिर्ती करणारा वीज प्रकल्पही उरणच्या किनाऱ्यावरच स्थापित करण्यात आलेला आहे. जेएनपीटीसारखे देशातील अत्याधुनिक बंदर आहे. या बंदरातून आयात करण्यात येणारे ज्वलनशील पदार्थ व तेलसाठेही उरण मध्ये आहेत. त्याचप्रमाणे भारत पेट्रोलियमचा देशातील सवार्त मोठा घरगुती वायु भरणा प्रकल्पही उरणच्या किनाऱ्यालगत उभारण्यात आला आहे. या प्रकल्पांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सुरक्षा ही महत्त्वाची आहेत. याप्रमाणे जगात प्रसिद्ध असलेल्या घारापुरी लेणी या उरण तालुक्याच्या सागरी हद्दीत येत आहेत. ही लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातील लाखो प्रवासी घारापुरी येथे येत असतात.

गस्त थांबली

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर रायगड जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सागरी पोलीस ठाण्यामध्ये उरणमधील मोरा येथील सागरी पोलीस ठाण्याचाही समावेश आहे. या पोलीस ठाण्याकडे एक बोट होती. मात्र तीही सध्या नाही. त्यामुळे पोलिसांची गस्त थांबली आहे.

मोरा सागरी पोलिसांकडे गस्तीसाठी बोट नाही. त्यामुळे घारापुरी येथे जाण्यासाठी पोलिसांनाच भाडय़ाची बोट करावी लागत आहे. 

– अभिजित मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोरा सागरी पोलीस ठाणे</p>

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ignoring safety sensitive uran ysh
First published on: 22-01-2022 at 00:02 IST