संतोष सावंत
पनवेल : करंजाडे नोड येथील राज्य विमा कर्मचारी निगमचे (ईएसआयसी) कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करावे या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील लाखो कामगारांना रुग्णालयीन सेवा किंवा कार्यालयीन कामासाठी अगोदर शंभर रुपयांची पदरमोड करावी लागत आहे. तसेच या रुग्णालयात सुविधांचाही अभाव आहे. त्यामुळे कामगार संतप्त आहेत.
दरम्यान, ईएसआयसीने तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये शंभर खाटांच्या रुग्णालयाची घोषणा केली आहे. मात्र अद्याप ते रुग्णालय कागदावर आहे. कार्यालय व दवाखान्याच्या जागेसाठी शोध सुरू असल्याची सबब गेल्या अनेक महिन्यांपासून देण्यात येत आहे. लोअर परळ व ठाणे येथील प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी याकडे काणाडोळा करीत असल्याने कामगारांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
\तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सुमारे एक लाख तर जवाहर इस्टेट, नवीन पनवेल व इतर औद्योगिक वसाहतींमधील ५० हजारांहून अधिक कामगारांना ईएसआयसीचे कवच मिळाले आहे. मात्र ही सर्व कागदोपत्री कार्यवाही झाली आहे. महिन्याला सुमारे दोन लाख कामगार व त्यांच्या सहा लाख कुटुंबीयांसाठी ईएसआयसी विम्याचे कवच पुरविण्याची सुविधा केंद्र शासनाने दिली आहे. यासाठी संबंधित कामगार त्यांच्या वेतनातून ३.२५ टक्के तर नियोक्ता त्यांच्याकडून एक टक्का असे अंशदान ईएसआयसीकडे जमा करतात. १० हजार रुपये वेतन असणाऱ्या कामगारांच्या वेतनातून सुमारे ४०० रुपये दरमहा जमा होतात. महिन्याला सुमारे ८ कोटी तर वर्षांला ९६ कोटी रुपये कामगारांच्या वेतनातून घेतले जातात, असे असताना सेवा देण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
करंजाडे नोडमधील सेक्टर ३ अ मध्ये एका इमारतीत ईएसआयसीचा दवाखाना व शाखा कार्यालय आहे. या ठिकणी कामगारांना रुग्णालयीन सेवा किंवा कार्यालयीन कामासाठी सातत्याने जावे लागते. मात्र हे रुग्णालय शहरापासून दूर असल्याने व दळणवळणाची चांगली व्यवस्था नसल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तीन आसनी रिक्षाला शंभर ते दोनशे रुपये पदरमोड करावी लागत आहे. त्यानंतर कार्यालय व दवाखान्यातील डॉक्टरांचे दर्शन होते. मात्र रुग्णालयात गेल्यानंतरही आरोग्य सुविधांची बोंब आहेच.या दवाखान्यात साधी बसण्यासाठी जागा नाही. गुरुवारी तर एका कामगाराच्या गर्भवती पत्नीला कार्यालयाच्या बाहेरच बसावे लागले होते. आत बसण्यासाठी जागा अपुरी आहे. येथील डॉक्टरांनाही गुदमरल्यासारखे होते. दोन गाळय़ांमध्ये ईएसआयसीच्या कार्यालय व दवाखान्यातील डॉक्टरांसहित १८ जण काम करीत आहेत. त्यात यात औषधालय, नोंदणीकक्ष आणि दवाखाना आहे. विशेष म्हणजे दवाखान्यात आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठीही कक्ष नाही.
शंभर खाटांचे रुग्णालय कागदावरच
ईएसआयसीचे तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये शंभर खाटांचे रुग्णालय शंभर कोटी रुपये खर्च करून उभारण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी जागा मिळाली आहे. मात्र हे रुग्णालय अजून कागदावर आहे. त्यामुळे हे रुग्णालय बांधून सुरू होण्यासाठी आणखी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे कामगारांची पदरमोड व गैरसोय कायम राहणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाने तातडीने तळोजा औद्योगिक वसाहत, कामोठे येथील भाडय़ाच्या मोठय़ा जागेत दवाखाना व कार्यालय स्थलांतर करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.
पुढील दीड महिन्यात पनवेल तालुक्यातील तीन जागांवर नवीन दवाखाना ईएसआयसी सुरू करणार आहे. यासाठी शासनाने निर्देश दिले असून या प्रक्रियेला काही दिवस लागतील. मात्र कामगारांना त्रास होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. – प्रणय सिन्हा, संचालक, ईएसआयसी