पनवेल – गुढीपाडव्याचा आनंद सर्वत्र साजरा होत असतानाच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात आयआयटी बॉम्बेच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सूर्योदय पाहून मुंबईकडे परतत असताना हा अपघात घडल्याने शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विद्यार्थ्यांमध्ये नाशिक येथे मूळ राहणारा ओमकुमार बोरसे (२३), नागपूर येथील लय देशभ्रतार (२०) आणि जयपूर येथे मूळ राहणारा श्रेयांश शर्मा (२२) यांचा समावेश आहे. हे तिघे व्होक्सवॅगन पोलो कारमधून प्रवास करत होते.प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी आपल्या अन्य मित्रांसह दुसऱ्या वाहनातून गुरुवारी पहाटे सुमारे ५ वाजता पवई येथील आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधून खंडाळ्याकडे सूर्योदय पाहण्यासाठी रवाना झाले होते.
सूर्योदय पाहिल्यानंतर ते मुंबईकडे परतत असताना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याच्या नजीक पनवेलपासून १० किलोमीटर आसपास पावणे नऊ वाजण्याच्या सूमारास त्यांच्या मोटारीचा अपघात झाला. पोलो कार उलटल्याने हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जाते.अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधितांच्या माहितीनुसार, तिन्ही वाहने एकामागोमाग मुंबईकडे येत होती.
पुढे जाण्याच्या घाईत असताना एका कारचा ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला उलटली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्तांना तातडीने कामोठे येथील महात्मा गांधी मिशन (एमजीएम) रूग्णालयात आणण्यात आले. मात्र रूग्णालयात पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनास्थळी कोणतेही प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे पोलिस तपास तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे सुरू आहे. “अपघात कशामुळे झाला, याचा सखोल तपास सुरू आहे,” अशी माहिती समोर येत आहे. अपघातामध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यूमुळे नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते, तिरूपती काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात जाऊन कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली.
दुपारी अडीच वाजण्याच्या सूमारास शवविच्छेनानंतर मृतांचे शव त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे आयआयटी बॉम्बे परिसरात शोककळा पसरली असून, तरुण विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच द्रुतगती मार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.
