अरुंद रस्ते आणि वाढती वाहने यामुळे उरण शहरात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे उरणमधील नागरिक तसेच बाजारपेठेत येणारे ग्राहक त्रस्त झाले असून उरण शहरातील रस्त्यांवर जागा मिळेल तिथे अनधिकृत फेरीवाल्यांनी आपल्या हातगाडय़ा तसेच ठेले लावल्याने वाहतुकीला तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उरण शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी उरणमधील नागरिकांकडून केली जात आहे.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उरण शहरातील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सुट्टीच्या तसेच सणाच्या दिवशी शहरात प्रचंड गर्दी असते. तर शहरात येणाऱ्या चारचाकी तसेच दुचाकी वाहनांना पार्किंगची सोय नसल्याने अनेक वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
त्याच्याच जोडीला आता शहरातील चौका चौकात व रस्त्याच्या कडेला हातगाडय़ा, भाजी-फळे विक्रेत्यांची दुकाने थाटली जात आहेत. त्यामुळे रस्ते सोडाच परंतु पदपथही व्यापले गेल्याने पदपथावरून प्रवास करणेही कठीण होऊन बसले आहे. तसेच भर रस्त्यात वाहने थांबवूनच बाजारपेठेत खरेदीही केली जात आहे.
अवघ्या अडीच ते तीन किलोमीटर अंतराच्या उरण शहरात शेकडोंच्या संख्येने फेरीवाल्यांच्या गाडय़ा जागोजागी लागू लागल्या आहेत. या अनधिकृत फेरीवाल्यांवर उरण नगरपालिकेची कारवाई होत नसल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे मत उरणचे रहिवासी दिनेश घरत यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दीच्या वेळी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
उरण शहरात नगरपालिकेने आनंद नगर ते पालवी रुग्णालय रस्त्यावरील अतिक्रमणे चार महिन्यांपूर्वीच हटविली आहे. असे असले तरी हा रस्ता फेरीवाल्यांनी व्यापल्याने जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे.