scorecardresearch

बेकायदा फेरीवाल्यांची भाऊगर्दी; मटनशॉप, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे आरोग्य धोक्यात

शहरात फक्त ७२२६ अधिकृत परवानाधारक फेरीवाले असून करोनाकाळातील आर्थिक संकटानंतर बेकायदा फेरीवाल्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

nm4 nmc
नवी मुंबई महापालिका (संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : शहरात फक्त ७२२६ अधिकृत परवानाधारक फेरीवाले असून करोनाकाळातील आर्थिक संकटानंतर बेकायदा फेरीवाल्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. ऐन पावसाळय़ात बेकायदा मटनशॉप तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

नवी मुंबईतील सर्वच विभागांत एकही रस्ता, चौक असा नाही की तेथे फेरीवाले व्यवसाय करीत नाहीत. असे असताना पालिका या फेरीवाल्यांना अभय का देत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या ७२२६ इतकी आहे. नवी मुंबई शहरात आतापर्यंत बेकायदा फेरीवाल्यांकडून पालिका कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक पथकातील व्यक्तींना मारहाणीच्या अनेक घटनासमोर आल्या आहेत.

नवी मुंबई शहरातील आठ विभागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा फेरीवाल्यांनी ठाण मांडलेले पाहावयास मिळते. सध्या पावसाळय़ाच्या दिवस सुरू असताना विविध साथीच्या रोगांना आमंत्रण देण्याचे काम उघडय़ावरील खाद्यपदार्थ विक्रेते करत असून बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या सर्वच विभागात फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढत आहेत. बेकायदा मटनशॉपही उदयास आली असून त्याच्या दरुगधीतून आरोग्याचे प्रश्न उभे राहू लागले आहेत.  वाशी सेक्टर ९,१० परिसरातही फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. 

कारवाईची माहिती फेरीवाल्यांना आधीच

शहरात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने विभाग कार्यालयाअंतर्गत कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी या पथकाबरोबर सुरक्षारक्षकही नेमलेले असतात. त्यांच्या संरक्षणात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. कारवाई करण्यासाठी पालिकेची गाडी येणार याची माहिती फेरीवाल्यांना अगोदरच मिळते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी फेरीवाल्यांच्या कारवाईबाबत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नेरुळ, सीवूड्स, वाशी, कोपरखैरणेसह विविध विभागात पदपथ व्यापणाऱ्या फेरीवाल्यांकडून नागरिकांवर दादागिरी करण्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

विभागवार अधिकृत फेरीवाले

  • बेलापूर- ६५४
  • नेरुळ- ९६४
  • वाशी- ११३०
  • तुर्भे-११३९
  • ऐरोली-६१२
  • दिघा-३५१
  • घणसोली-६४८
  • कोपरखैरणे- १८२८

शहरात परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या ७२२६ आहेत व अनेक फेरीवाल्यांची नोंदणी फेरीवाला धोरणानुसार प्रक्रियेत आहे. तसेच फेरीवाले व बेकायदा मटन व इतर दुकाने याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल. 

– श्रीराम पवार, उपायुक्त परवाना

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-07-2022 at 09:23 IST