scorecardresearch

महानगरपालिकेच्या अंगणात बेकायदा रोपवाटिका; पालिकेचे दुर्लक्ष, बेकायदा रोपवाटिकांना कोणाचे अभय

शहरातील विविध विभागात वाढणाऱ्या बेकायदा रोपवाटिकांनी आता पालिकेलाच आव्हान दिल्याचे चित्र आहे.

नवी मुंबई : शहरातील विविध विभागात वाढणाऱ्या बेकायदा रोपवाटिकांनी आता पालिकेलाच आव्हान दिल्याचे चित्र आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पारसिक हिलच्या पायथ्याशी आग्रेळी गावाजवळ असलेल्या जल उदंचन केंद्राच्या भिंतीचाच व मुख्य जलवाहिनीचा आधार घेत बेकायदा रोपवाटिका थाटण्यात आली आहे.
याच केंद्रात येणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही बेकायदा रोपवाटिका दिसतच नाही का तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीलाच या रोपवाटिकेने आपल्या कवेत घेतले असताना पालिका व सिडकोचा अतिक्रमण विभाग धृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर पडणार कधी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
नवी मुंबईत शहरभर बेकायदा रोपवाटिकांनी सिडकोच्या व पालिकेच्या मोकळय़ा जागा गिळंकृत करून फुटपाथ, ताब्यात घेतले असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सिडकोने कुंपण घातलेल्या भूखंडावरही ताबा मिळवून बेकायदा रोपवाटिका स्थापल्या आहेत. बेकायदा रोपवाटिकांनी बसथांब्यांनाही विळखा घालायला सुरुवात केली आहे. सानपाडा, नेरुळ, बेलापूर, सीवूड्स, कोपरखैरणे विभागात अनेक ठिकाणी येथील बसथांब्याभोवतीही अशाच प्रकारे नर्सरी थाटल्या आहेत.
शहरात सिडको, महापालिका, एमआयम्डीसीच्या सार्वजनिक भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. शहरातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी नसून अनधिकृत फेरीवाल्यांना आंदण दिल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. अतिक्रमणांवर कडक कारवाई होण्याऐवजी त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
पारसिक हिलच्या पायथ्याशी असलेल्या मुख्य जल केंद्राला लागूनच बेकायदा रोपवाटिका सुरू असून मुख्य जलवाहिनीही त्यामध्ये लपली आहे.
भविष्यात याच जलवाहिनीला फोडून पाण्याचाही गैरवापर सुरू झाला तरी पालिकेला पत्ता लागणार नाही. त्यामुळे पालिकेच्या बेलापूर विभाग कार्यालयाने याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे.
रोपवाटिकांना राजकीय आसरा ?
बेलापूर येथील जल उदंचन केंद्रालगत बेकायदा रोपवाटिका थाटलेल्या रोपवाटिकाधारकाला विचारणा केली असता त्याने एका स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्याने मला इथे रोपवाटिका सुरू कर, मी आहे असे सांगितले. या मोबदल्यात त्याला भाडे द्यावे लागत नाही, परंतु त्याच्या घरासाठी लागणारी झाडे व इतर सुशोभीकरणाची कामे माझ्याकडून करून घेतली जात असल्याची माहिती या रोपवाटिकाधारकाने दिली. त्यामुळे बेकायदा रोपवाटिकांना बळ देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
बेलापूर येथील पारसिक हिलच्या पायथ्याशी असलेल्या रोपवाटिकेवर कारवाई करण्यात येईल. तसेच सिडकोला त्यांनी दिलेल्या रोपवाटिकांच्या जागांबाबत सद्य:स्थिती तात्काळ कळवण्याबाबतचे पत्र सिडकोला देण्यात आले आहे. – मिताली संचेती, बेलापूर विभाग सहा. आयुक्त

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Illegal nursery courtyard corporation ignorance municipality about illegal nurseries amy

ताज्या बातम्या