लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई हे नियोजनबद्धरित्या वसवलेल शहर असून पामबीच मार्गावर दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट बनत चालला आहे. बेलापूर किल्ले गावठाण चौकापासून वाशीपर्यंत पामबीच मार्गावर कोठेही पार्किंग होत नसताना वाशी उपनगरालगताच रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे नवी मुंबई वाहतूक पोलिसांचे तसेच महापालिकेचेही दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका व वाहतूक विभाग करत असलेली कारवाई तोकडी पडत आहे.

नवी मुंबईचा क्विन्स नेकलेस समजला जाणारा पामबीच मार्ग हा वेगवान मार्ग म्हणून प्रसिद्ध असला तरी याच मार्गावर वाशी उपनगराच्या पहिल्याच सिग्नलपासून ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत बेकायदा पार्किंग मोठ्या प्रमाणावर केले जाते. सतरा प्लाझा परिसरात बेकायदा पार्किंगने वाहतूक व्यवस्थेचा पुरता खेळखंडोबा करून टाकल्याचे चित्र आहे. या मार्गावर बेकायदा पार्किंग ही पालिकेची व वाहतूक पोलीस विभागाची डोकेदुखी ठरली आहे.

आणखी वाचा-जेट्टीअभावी जुहू गावातील मच्छीमारांची गैरसोय

शहरात ‘व्हॅले पार्किंग’चा वापर सुरू झाल्याने वाशीतील सतरा प्लाझासह शहरातील विविध मॉल व कमर्शिअल पार्कसमोर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन आयुक्त रामास्वामी यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. सतरा प्लाझा व त्यापुढील वाहने दुरुस्त व सजावट करण्याच्या दुकानांच्या बाहेरील बाजूला करावयाची कायमस्वरुपी उपाययोजना कागदावरच राहिली आहे. या सर्व उपाययोजना लालफितीच्या फेऱ्यात अडकल्याने या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.

पामबीच रस्त्यावर व्हॅले पार्किंग सुरु आहे. वाशीत ऑरेंजा कॉर्नर ते कोपरी पुलापर्यंत सातत्याने येथे बेकायदा पार्किंग केले जाते. या ठिकाणी बेकायदा गॅरेज व इतर वाहनांशी संबंधित विविध वस्तूंची विक्रीची दुकाने आहेत. पालिकेने या मार्गावर नो पार्किंगचे जवळजवळ १२५ फलक लावले आहेत. पण ते फक्त नावापुरते उरले आहेत. येथील बेकायदा पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर महापालिका व वाहतूक विभागकडून कारवाई केली जाते. मात्र त्यांची पाठ फिरताच पुन्हा गॅरेजवाल्यांची व वाहनचालकांची मनमानी सुरू असते.

आणखी वाचा-उरणमध्ये विजेचा लपंडाव, शहर तसेच ग्रामीण भागांतील नागरिक संतप्त

सतरा प्लाझा येथे रस्त्याच्या कडेला सिंगल पार्किंग होत आहे. सतरा प्लाझामध्ये विविध प्रकारची दुकाने, कार्यालये आहेत. कोपरीपासून विविध वाहनांच्या खरेदी-विक्रीची व दुरुस्तीची दुकाने आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग केले जात आहे. तुर्भे सेक्टर १९ ई व १९ सी या ठिकाणी नियमानुसार वेअरहाऊस आहेत. परंतु व्यावसायिकांनी बेकायदा पामबीच मार्गाच्या बाजूने दुकानांचा प्रवेश सुरु केला आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार अपघाताच्या घटना घडतात. विविध हॉटेल, मॉल, वाहनांच्या शोरूम्स येथे असून त्यांचे प्रवेशद्वार पामबीच रस्त्याच्या बाजूला नसून ते मागील सर्व्हिस रोडवर असतानादेखील व्यावसायिक वापरासाठी या ठिकाणच्या दुकानांचे प्रवेशद्वार पामबीच मार्गाच्या बाजूला आहेत. सतरा प्लाझाच्या विरुद्ध बाजूला सोना सेंटर बसथांबा आहे. तेथेही बेकायदा पार्किंग केले जात आहे.

पामबीच मार्गावर सतरा प्लाझा परिसरात करण्यात येणारे बेकायदा पार्किंग व बेकायदा व्यवसाय याबाबत पालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. या ठिकाणी दोन सुरक्षारक्षक ठेवण्यात येतील. -भरत धांडे, सहाय्यक आयुक्त, तुर्भे विभाग, नमुंमपा

पामबीच मार्गावरील सतरा प्लाझा परिसरात दोन्ही बाजूला होणाऱ्या बेकायदा पार्किंगबाबत अधिक लक्ष ठेवून विशेष कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी सातत्याने दोन अंमलदार नेमले आहेत. -तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक विभाग