कळंबोलीतील वाहतूक कोंडी सुटणार

पनवेल : गेली २० वर्षे अवजड वाहने उभी केली जात असल्याने रहदारीस अडथळा होऊन गुरुकृपा हॉेटेल ते कळंबोली सर्कल रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीचा पेच निर्माण होत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिल्यानंतर वाहतूक पोलिसांनी सातत्याने कारवाई केल्यानंतर आता या ठिकाणची बेकायदा पार्किंग बंद झाली आहे. यामुळे हा रस्ता खुला झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १० हजार १५४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत दोन लाख ३४ हजार रुपये वसूल केले. तर भारतीय दंड संहिता २८३ प्रमाणे रहदारीस अडथळा केल्यामुळे जड व अवजड वाहनांच्या १९६ चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे या कारवाईत सातत्य ठेवले. त्यामुळे हा पेच आता सुटला आहे. मात्र यापुढेही वाहतूक पोलिसांनी यावर कटाक्ष ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मुंब्रा पनवेल महामार्गालगत कळंबोली लोखंड पोलाद बाजारातील मुख्य रस्ता आहे. मात्र बेकायदा पार्किंगमुळे या मार्गावरील रहदारीस सातत्याने अडथळा होत होता. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर नियंत्रणासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कळंबोली येथे सुरू केला आहे. मात्र हा प्रश्न कायम होता. काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री आजित वार यांचा दरबारात हा प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर  गेल्या सहा महिन्यांतील केलेल्या सातत्याच्या कारवाईमुळे गुरुकृपा हॉटेल ते कळंबोली सर्कल या लोखंड बाजारातील निम्मा रस्ता खुला झाला आहे. मात्र अजूनही रोडपाली फूडलँड ते बीमा कॉम्पलेक्स या दरम्यानच्या रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत.

गेल्या सहा महिन्यांतील सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घेतलेल्या श्रमाचा हा परिणाम आहे. या कारवाईमुळे अनेकदा वाहनचालक व मालकांशी वाद झाले. मात्र वाहन अधिनियम आणि भादंवि कायद्याप्रमाणे कारवाईचे सातत्य राखले. हा निम्मा टप्पा पूर्ण झाला असून अजूनही निम्म्या रस्त्यावर वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केल्यास कारवाई अटळ आहे.

 – निशिकांत विश्वकार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक शाखा