नवी मुंबई : नवी मुंबईतील सर्वात वर्दळीचे स्टेशन म्हणजे सीवूड्स दारावे रेल्वेस्थानक. याच रेल्वेस्थानक परिसरात ग्रँड सेन्ट्रल मॉल आहे. त्यामुळे या रेल्वेस्थानकात मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते.
मागील काही दिवसापासून सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला उड्डाणपुलाखालील भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बस उभ्या आहेत. या बस रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गातच उभ्या आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकाकडे जायचे कसे असा प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि रेल्वेप्रवाशांना पडला आहे. याच ठिकाणी बस चालक रस्त्यातच ठिय्या मांडून बसलेले असतात त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या महिला तसेच महाविद्यालयीन तरुणाई सुरक्षित नाही. याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी स्थानिक रहिवासी आणि प्रवासी करू लागले आहेत.
सीवूड्स पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या परिसरात टिळक महाविद्यालय, प्रेझेन्टेशन स्कूल अशा शाळा व महाविद्यालय आहेत. तसेच सीवूडस सेक्टर २५,२७, आयकर कॉलनी या विभागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात या उड्डाणपुलाखाली पूर्व दिशेच्या स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करतात. परंतु याच उड्डाणपुलाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या बस या ठिकाणी पार्किंग करण्यात येतात. याच ठिकाणाहून रेल्वेप्रवासीही मोठय़ा प्रमाणात येजा करत असतात. परंतु त्यांच्या मार्गावरच मध्येच गाडय़ा उभ्या केलेल्या आहेत. येथील नागरिकांनी मात्र याबाबत संताप व्यक्त केला आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधार असतो. कोणता अनुचित प्रकार झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न रेल्वेप्रवासी व स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
शहरात नेरुळ येथील डॉ.डी वाय पाटील मैदानावर आयपीएलचे सामने होत आहेत. याच मैदानाच्या बाजूला रस्त्यावर या बस उभ्या असतात. पालिकेने तेथून या गाडय़ा हटवल्या आहेत. परंतु नागरिकांची वर्दळ असलेल्या मार्गावरच या बस उभ्या करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सीवूडस रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरच उड्डाणपुलाखाली अनेक गाडय़ा मनमानी पद्धतीने उभ्या केल्या आहेत. याच मार्गावरून महिला व महाविद्यालयीन तरुणी जातात. बसच्या आड अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण असेल. या गाडय़ा रेल्वेस्थानकाजवळ उभ्या करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. येथील बस निर्मनुष्य असलेल्या मोकळय़ा जागी शहराबाहेर उभ्या कराव्यात.-साहेबराव शिंदे, स्थानिक रहिवासी, सीवूडस पूर्व

आयपील सामन्याच्यासाठी स्टेडियम जवळ लावण्यात आलेल्या गाडय़ा या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात हलवण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी येथे सुरक्षारक्षक ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल.-मिताली संचेती, विभाग अधिकारी बेलापूर