नवी मुंबई : गेल्या आठवडय़ात बुधवारी गणपतींचे वाजत गाजत आगमन झाल्यानंतर उत्साह पाहता विसर्जन मिरवणुकाही धूमधडाक्यात निघणार आहेत. महापालिका प्रशासनासह, पोलीस व वाहतूक विभागाने यासाठी नियोजन केले आहे. मात्र बुधवारपासून दुपारनंतर होत असलेल्या मुसळधार पावसाचे सावट या मिरवणुकांवर आहे.

महापालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव सोहळय़ासाठी वाशी शिवाजी चौक येथे गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे तर वाशी तसेच कोपरखैरणे येथील मोठय़ा मूर्तीच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्थाही केली आहे.     महापालिकेच्या वतीने २२ पारंपरिक नैसर्गिक व १३४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर व्यवस्था केली आहे. 

विसर्जन स्थळांवर स्वयंसेवक, जीवरक्षक यांची नेमणूक केली आहे. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवान कार्यरत असणार आहेत. पोलिसांनीही बंदोबस्त लावला आहे. २२ विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. विसर्जनास्थळी तराफे तसेच क्रेनची व्यवस्था करण्यात आली असून गर्दी नियोजनासाठी सुरक्षा भिंती उभारण्यात आल्या आहेत. विद्युत व्यवस्थेसह जनरेटर तयार आहेत. पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधांचे कक्षही स्थापन करण्यात आले आहेत. निर्माल्य टाकण्यासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. जमा होणारे निर्माल्य वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून ते तुर्भे प्रकल्पस्थळी पाठवण्यात येणार आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांनीही मिरवणुकांची तयारी केली आहे. दोन वर्षांनंतर मिरवणुका होणार असल्याने कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह आहे. त्यामुळे मिरवणुका लांबण्याची शक्यता आहे. मात्र बुधवारपासून दुपारनंतर जोरदार पाऊस होत आहे. गुरुवारीही मोठा पाऊस झाला असून हवामान विभागाने आणखी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या मिरवणुकांवर पावसाचे सावट आहे.

वाहतुकीत बदल

नवी मुंबई : गणपती विसर्जन मिरवणुकांसाठी नवी मुंबईतील गर्दीचे ठिकाण असलेल्या वाशी व बेलापूर येथील वाहतुकीत वाहतूक पोलिसांनी बदल केले आहेत. हा बदल हे शुक्रवारी सकाळी १० पासून ते शनिवारी सकाळी गणेशमूर्ती विसर्जन संपेपर्यत करण्यात आलेला आहे. 

मार्ग बंद :  ब्ल्यू डायमंड चौकातून शबरी हॉटेल, वाशी सेक्टर ९ व १६ मार्केट मार्गे छ. शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा मार्गावर प्रवेश बंदी.

पर्यायी मार्ग : ब्ल्यू डायमंड सिग्नलकडून कोपरी चौक, पाम बीच मार्गे अरेंजा कॉर्नरपासून पुढे..

मार्ग बंद :  वाशी प्लाझा सिग्नलकडून छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ब्ल्यू डायमंड चौक

पर्यायी मार्ग : वाशी प्लाझा चौकातून पामबीच मार्गे महात्मा फुले भवन चौक अरेंजा कॉर्नर मार्गे कोपरी सिग्नलपासून ब्ल्यू डायमंड..

मार्ग बंद : अरेंजा सर्कल टायटन शो रूममार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नूर मज्जीद बोहरा मज्जीद मार्गे एमटीएनएल चौक जागृतेश्वर मंदिर.

पर्यायी मार्ग :  पामबीच मार्गे सिटीबँक चौक पासून छत्रपती संभाजी महाराज चौकमार्गे पुढे ..

सीबीडीतही बदल

सीबीडी पोलीस ठाणे हद्दीत कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते दक्षिणेस सेक्टर १५ कडे जाणारा रस्ता व सेक्टर १५ कडून उड्डाणपुलावरून कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाकडे येणारा रस्ता हा मार्ग गणेश विसर्जन वाहने सोडून अन्य वाहनांना बंदी आहे. त्यांना पर्यायी मार्ग दिवाळे जंक्शन ते भाऊराव पाटील मार्ग रेल्वे स्टेशन सेक्टर ११ मार्गे पुढे जाता येणार आहे.

पावसामुळे तारांबळ

गुरुवारी सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी विसर्जन असल्याने बहुतांश मंडळांच्या पूजा या गुरुवारी आयोजित केल्या होत्या. महाप्रसादही ठेवण्यात आला होता. मात्र दुपारनंतर पाऊस सुरू झाल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पावसामुळे महाप्रसादाचा लाभ अनेकांनी न घेतल्याने अन्न वाया गेल्याची खंतही अनेकांनी व्यक्त केली.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विसर्जन सोहळा व्यवस्थित पार पडण्यासाठी योग्य त्या सुविधा करण्यात आल्या आहेत. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. वाशी येथे मोठय़ा मंचावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणाऱ्या गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 

– सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, महापालिका