उरण : करंजा बंदर परिसरात पावसाळी बंदी काळातही अवैधरीत्या मासेमारी करणाऱ्या पाच बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई मागील सात दिवसांत उरण, मुंबई, रायगड समुद्रात करण्यात आली आहे.
राज्य व केंद्र सरकारने १ जून ते ३१ जुलै दरम्यानच्या ६० दिवसांची समुद्रात मासेमारीसाठी बंदी घातली आहे. असे असतानाही जय गौरी नंदन, एकवीरा माता, श्री जागृत गौराई, भवानी जगदंबा, देवाची आळंदी आदी बोटी मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेल्या होत्या. या बोटींतून बंदरावर रात्रीच्या वेळी मासे उतरविले जात असताना कारवाई करण्यात आली. या बोटींवर लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. अवैध मासेमारी सुरू असल्याची माहिती मिळताच मत्स्य व्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी कारवाई करून १ लाख ३० हजारांचा दंड वसूल केला आहे.
संयुक्त गस्तिपथकाचे दुर्लक्ष
देशाच्या सुरक्षेत सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. किमान सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संयुक्त गस्त घालणाऱ्या कोस्टगार्ड, केंद्रीय सुरक्षा बल, सागरी पोलिसांनी बंदी काळातही अवैधरीत्या मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बोटींची तपासणी करून कठोरपणे कारवाई करण्याची अपेक्षा आहे. मात्र, संयुक्त गस्तिपथक पुढाकार घेताना दिसत नसल्याने नियमांचे उल्लंघन होत आहे.
… तर जिवाला धाेका
मत्स्य बीज उत्पादन वाढण्यासाठी पावसाळ्यात दोन महिन्याची मासेमारी बंदी करण्यात येते मात्र ही बंदी धुडकावून मासेमारी बोटी मासेमारी करीत आहेत. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे आशा प्रकारची मासेमारी करणाऱ्यांच्या जिवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.