पनवेल: खारघर येथील मेडिकवर रुग्णालयात कर्करोगावरील केमोथेरपी करून आता त्याच दिवशी घरी जाता येणार आहे. शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत या वार्डाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी चिवटे यांनी या रुग्णालयात किमोथेरेपी घेणाऱ्या सर्व रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाईल तसेच कर्करोगासंबंधीत शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आणि अवयव प्रत्यारोपण सारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून २ लाख रुपयांची मदत केली जाईल अशी घोषणा चिवटे यांनी केली.

कर्करोगाशी लढा देणाऱ्या रुग्णांसाठी तसेच केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी नवी मुंबईच्या खारघर येथील मेडिकवर रुग्णालयाने सुरक्षित आणि उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी केमो डे केअर वॉर्ड सुरू केला असून या नवीन सुविधेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने  एकाच वेळी १५ रुग्ण केमोथेरपी उपचार घेऊ शकतील. मेडिकवर रुग्णालयाकडून केवळ रोगावर उपचार करण्यासाठीच नव्हे तर,या आव्हानात्मक काळात रुग्णांना होणारा त्रास, त्यांची गैरसोय कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असल्याचे रुग्णालयाचे केंद्र प्रमुख डॉ. माताप्रसाद गुप्ता यांनी सांगीतले. 

हेही वाचा : पनवेल : शेकापचे जे. एम. म्हात्रे यांच्यावर वन विभागाकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल

कर्करोगाच्या रूग्णांना केमोथेरपीनंतर प्रकृती स्थिर झाल्यावर घरी परतणे हा प्रवास खूप त्रासदायक असल्याने रुग्णांना सर्वाधिक अशक्तपणा येतो. यासाठी रुग्णांना केमोथेरपीनंतर त्याच दिवशी घरी परतण्यासाठी केमो डे केअर वॉर्डचा अभिनव उपक्रम मेडीकवरने केला आहे. या रुग्णालयात कर्करोगाचे उच्च दर्जाचे व यशस्वी उपचार केले जातील असा विश्वास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :  मुंबई ते कुडाळ २० तासांचा खडतर प्रवास

नवीन डे केअर वॉर्ड हे कर्करोगाच्या रूग्णांसाठी उपचार पद्धती बदलत आहे. हा वॉर्ड रुग्णांसाठी सोयी आणि आराम या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देतो. केमोथेरेपी घेतल्यानंतर त्याच दिवशी ते घरी जाऊ शकतात हे रुग्णांना दिलासा देणारे आहे. वॉर्ड रुग्णांना आणि त्यांच्या प्रियजनांना केमोथेरपी-संबंधित दुष्परिणामांना प्रतिबंध आणि व्यवस्थापनाबाबत शिक्षित करेल. हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेत असलेल्या आणि प्रमाणापेक्षा जास्त केस गळत असणाऱ्या रुग्णांना केमो कॅप्स दिल्या जातील. 

डॉ. डोनाल्ड जॉन बाबू (सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकवर रुग्णालय)