नवी  मुंबईत  करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत.आज  शहरात २२४ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची  संख्या ५  हजार ८५३ झाली आहे. तर, शहरात आज  ५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

याचबरोबर करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या १९४ झाली आहे. शहरात करोनामुक्त होण्याचा दर चांगला असून शहरात आतापर्यंत ५ हजार ८५३ रुग्णांपैकी तब्बल ३ हजार २९४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

नवी मुंबईला सुनियोजित शहर म्हटले जाते. देशभरात करोनाचा कहर सुरु असून टाळेबंदीनंतर ८ जूनपासून अनलॉक करण्यात आल्यानंतर शहरात करोनाची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने नवी मुंबईमधील १० कंटेनमेंट  झोन सोमवारी २९ जूनपासून ५ जुलैपर्यंत प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या ८ दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता निश्चित करण्यात आलेल्या कंटेनमेंट  झोनमध्ये टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे.

नवी मुंबई या सुनियेजित शहरात करोनाचा कहर वाढत आहेत. सुव्यवस्थित नियोजनबद्ध असलेल्या नोडबरोबरच मूळ गावे आहेत. तर अनेक भागात झोपडपट्ट्या आहेत. ७ जूनपर्यंत नवी मुंबई शहरात केवळ २ हजार ९७४ करोना रुग्ण होते. परंतू ८ जून पासून करण्यात आलेल्या अनलॉकनंतर ही संख्या ५ हजार ८५३ झाली आहे. मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आठ दिवस कंटेनमेंट  झोनमध्ये टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून नागरीकांनी नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मास्क स्क्रीनिंगद्वारे आरोग्य तपासणी –
नवी मुंबई महापालिकेकडून शहरातील १० प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली असून, त्या ठिकाणी २९ जून ते ५ जुलैपर्यंत करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः लॉकडाउन करण्यात येणार आहे. या ठिकाणी घरोघरी जाऊन मास स्क्रिनींग मोहिमद्वारे नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, असे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले आहे.

पालिकेने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असून त्या ठिकाणच्या नागरिकांनी नियम तोडल्यास कारवाई करण्यात येईल, असे
परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त पंकड डहाणे यांनी सांगितले आहे.

नवी मुंबईतील १० प्रतिबंधित क्षेत्र  –
बेलापूर विभागातील – दिवाळे गाव,करावे गाव
तुर्भे विभाग – तुर्भे स्टोअर, तुर्भे सेक्टर २१,  तुर्भे गाव
वाशी विभाग – जुहू गाव सेक्टर ११
कोपरखैरणे विभाग – बोनकोडे व खैरणे गाव, कोपरखैरणे गाव
घणसोली विभाग – रबाळे गाव
ऐरोली – चिंचपाडा